• गोवा सीमेवर ४ तर महाराष्ट्र सीमेवर २० चेकपोस्ट सुरु
  • जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती 

बेळगाव / प्रतिनिधी 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा आणि महाराष्ट्र सीमेवर २४ आंतरराज्य सीमावर्ती पोस्ट सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील चेक पोस्टवर आत्तापर्यंत रोकड, मद्य यांसह एकूण १.४९ कोटींच्या वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.

राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पूर्वतयारी संदर्भात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या  निर्देशानुसार अनधिकृत बॅनर, पोस्टर लावू नयेत, अशी सूचना करावी. सूचनेचे पालन न करणाऱ्यांवर  बॅनर पोस्टर हटविण्याबरोबरच दंडात्मक कारवाई करावी. आदर्श आचारसंहिता जारी झाल्यानंतर निवडणूक प्रचाराशी संबंधित अनुमती देण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी एक खिडकी योजना राबवावी, अशी सूचनाही जिल्हाधिकारींनी अधिकाऱ्यांना केली. या बैठकीला शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर उपस्थित होते.

-आत्तापर्यंत जिल्ह्यातील विविध चेक पोस्टवर करण्यात आलेली कारवाई-

कणबर्गी चेकपोस्टजवळ ९ लाखाची रोख रक्कम जप्त - 


कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणबर्गी येथील चेक पोस्ट जवळ 9 लाखाची रोख रक्कम जप्त केली. निवडणूक भरारी पथक,  पोलीस खात्याने मंगळवारी दुपारी ही कार्यवाही केली. बेळगावहून अंकलगीकडे जाणारी कार  तपासली असता त्यामध्ये ९ लाखांची रोख रक्कम असल्याचे आढळून आले.

ही रक्कम एका खाजगी आर्थिक संस्थेची आहे. परंतु त्यांनी सोबत योग्य ती कागदपत्रे न घेतल्याने रक्कम ताब्यात घेतल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. शिवाय पैशांची ने-आण करण्यासाठी नियमावली आहे. त्याचेही पालन करण्यात आले नाही.

मार्केट पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्दनगौडा, माळ मारुती  पोलीस स्थानकाचे निरीक्षक जगदीश हंचिनाळ, भरारी पथकाचे अधिकारी यादगूड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. दरम्यान निवडणुकीनिमित्त नियुक्त पथकाच्या अधिकाऱ्यांकडून अत्यंत कर्तव्यदक्षपणे काम करण्यात येत आहे. त्यांचे अभिनंदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे.

बाची चेकपोस्टवर १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 


बाची चेकपोस्ट जवळ वाहन तपासताना त्यामध्ये गोवा बनावटीचे मद्य असल्याचे आढळून आले. याची किंमत ७ लाख २२ हजार ४०० रु. होते. अबकारी पोलिसांनी मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास ही कारवाई केली.

गोव्याहून बेळगावला मद्य येत असल्याची माहिती अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. शिवाय कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरील बाची येथे निवडणुकीमुळे चेक पोस्ट देखील उभारले आहे. या चेक पोस्टवर महिंद्रा पिकअप (केए २२ डी ६२७५) हे वाहन अडवण्यात आले.

तपासणी केली असता ८६ बॉक्स गोवा बनावटीचे ७७ लि. मद्य सापडले. त्याची बाजारभावानुसार किंमत ७ लाख २२ हजार ४०० रु. होते. याप्रकरणी वाहन चालक रोहित कोवाडकर (रा. बेळगाव) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. अबकारी पोलीसप्रमुख विजय हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई केली.

-सदलगा - दत्तवाड चेकपोस्टवर १६ लाखांच्या साड्या ताब्यात



कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिक्कोडी येथील सदलगा - दत्तवाड चेक पोस्टवर १६ लाखांच्या साड्या वाहनासह  जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. रायबाग विधानसभा मतदारसंघातील मतदारांना वाटण्यासाठी हे साहित्य घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी वाहन चालक कदीर दावर शेख (वय ६०) आणि वसंत राजव्वा कांबळे (वय ५०, रा. उचगाव, हुंकरा कॉलनी (ता. करवीर जि. कोल्हापूर) यांना ताब्यात घेतली असून त्यांची चौकशी सुरू आहे. साडी प्रत्येकी ३५० रु. (अंदाजे किंमत १६ लाख रु.) अशा एकूण ५००० साड्या वाहनात आढळून आल्या. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या अशोक लेलँड  मिनी टेम्पोची किंमत ३ लाख रु. आहे.

-दड्डी चेकपोस्टवर २ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुक्केरी तालुक्यातील दड्डी येथील पोस्टवर  केलेल्या कारवाईत पोलिसांनी गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन जप्त केले. जप्त केलेल्या मद्यसाठ्यात  २५० एमएलच्या १०७ बाटल्या आहेत. या स्वरूपाची दारू केवळ गोव्यामध्ये विक्रीसाठी दड्डी चेक पोस्ट मार्गे जात असल्याची माहिती मिळाली होती. याची माहिती मिळताच पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान ही कारवाई केली.

-अनमोड तपासणी नाक्यावर गोवा बनावटीचा मद्यसाठा ताब्यात -

गोव्यातून बेळगाव मार्गे गुजरातकडे निघालेल्या मालवाहू टेम्पोतून गोवा बनावटीच्या १५८ लि. मद्यासह ५.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अबकारी खात्याने मंगळवार  दि. २१ रोजी अनमोड  तपासणी नाक्यावर ही कारवाई केली. याप्रकरणी फिरोज हाजी भाई लोचा (रा. गुजरात) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनमोड नाक्यावरील तपासणी कडक करण्यात आली आहे. तरीसुद्धा काहीजण चालाखीने मद्य वाहतूक करत आहेत. मंगळवारी गोव्याहून गुजरातकडे निघालेल्या  मालवाहू टेम्पो (क्र. जीजे ०१, डीयु ०५२२) तपासणी केली असता त्यात १५८ लि. मध्य आढळून आले. टेम्पोमध्ये  चोरकप्पा तयार करून मद्यवाहतूक केली जात होती. अबकारी अधिकाऱ्यांनी  मद्य व टेम्पो  मिळून  ५,६४,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई उप निरीक्षक श्रीकांत असोदे, हवालदार बाळकृष्ण के.,आर.एन. नाईक, यु.एन. तुळाजी आदींनी केली.

विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या  पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील सीमांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून  संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.