खानापूर / प्रतिनिधी
तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुपच्या लैला साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता व समारोप शेतकरी मेळावा कार्यक्रम रविवारी दि १९ रोजी कुप्पटगिरी भावकेश्वरी मंदिराच्या पायथ्याशी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक, लैला साखर कारखान्याचे चेअरमन व भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चाचे माजी उपाध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. तसेच भाजपचे नेते किरण येळ्ळुरकर, सुभाष गुळशट्टी,शांतिनिकेतन काॅलेजचे चेअरमन प्राचार्य बंडू मजूकर, किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रकाश तिरवीर, मनोहर कदम, श्री महालक्ष्मी ग्रुपचे संचालक विठ्ठल करंबळकर,महादेव बांदिवडेकर,चांगाप्पा निलजकर, यल्लापा तिरवीर,मारूती पाटील, तसेच भाजपचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत लैला साखर कारखान्याचे एम. डी. सदानंद पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा विश्वासाने व वेळेत उसाचा पुरवठा केला. त्यामुळे यंदाचा गळीत हंगामात ३ लाख १५ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. केवळ शेतकरी वर्गाच्या विश्वासामुळे व सहकार्यामुळे साखर कारखाना व्यवस्थित चालवू शकलो.
शेतकर्याच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवुन शेतकर्याच्या बीलाची पूर्तता करण्यात आली. यंदाच्या गळीत हंगामात ३ लाख १५ हजार टन गाळप होऊन पहिला हप्ता २६०० रूपये प्रति टन दर देऊन आता दुसरा हप्ता २०० रूपये देणार आहे. असे सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की दुसरा हप्ता एप्रिल महिन्याच्या १५ तारखेनंतर १५० रूपये व उर्वरित ५० रूपये गणपतीच्या सणानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. याचबरोबर शेतकर्याच्या साठी ड्रेस कोड ची योजना राबविण्यात येणार आहे. असे सांगितले. यावेळी हजारो शेतकरी, लैला साखर कारखान्याचे कर्मचारी, संचालक मंडळ, सभासद उपस्थित होते. आभार श्री महालक्ष्मी सोसायटीचे जनरल मॅनेजर टी. डी. हुंदरे यांनी मानले.
0 Comments