बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव उत्तर मतदारसंघातील अनुसूचित जाती - जमातींच्या युवक - नागरिकांसाठी आजचा गुढीपाडवा सण आनंददायी ठरला. बेळगाव महानगरपालिकेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात त्यांचे स्वतःचे वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर निगम, आदीजांबव निगम, तांडा अभिवृद्धी निगम, भोवी निगम यांच्या अनुदानातून एकूण 80 दुचाकींचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्याहस्ते लाभार्थ्यांना दुचाकींच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अनिल बेनके म्हणाले , सरकारच्या विविध निगमांच्या एससी-एसटी विशेष अनुदानातून आज 80 लाभार्थ्यांना दुचाकींचे वितरण करण्यात आले आहे. आंबेडकर, वाल्मिकी निगम आदी निगमांनी यासाठी अनुदान दिले आहे. यासाठी सरकारकडून 50 हजार अनुदान दिले जाते. 20 हजार कर्जरूपाने दिले जातात. वरची रक्कम लाभार्थ्यांनी भरायचे अशी ही योजना आहे. गोरगरीब लाभार्थ्यांनी या योजनेचा सदुपयोग घ्यावा असे आवाहन आ. बेनके यांनी केले.

यावेळी आ. अनिल बेनके व लाभार्थ्यांनी नवीन वाहनावरून काही अंतर फेरफटका मारला. माजी महापौर चिक्कलदीनी, समाजकल्याण खाते, निगमचे अधिकारी सुरेश होनवाडे, बी. एफ. उप्पीन, मनपा अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.