विजयपूर / दिपक शिंत्रे
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विजयमहंतेश बी. दानम्मनवर आणि जिल्हा पोलिस प्रमुख एच. डी. आनंद कुमार यांनी रात्री उशिरा अचानक भेट देऊन चेकपोस्टच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजाची पाहणी केली.
जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील कानमडी, अलगीनाळा यासह विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या चेकपोस्टला भेट देऊन त्यांनी सांगितले की, निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच निवडणुकीतील अनियमितता टाळण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर ठिकठिकाणी आंतरराज्य चेकपोस्ट उभारण्यात येत आहेत. निवडणूक गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या हद्दीतून प्रवेश करणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या वाहनांची सक्तीने तपासणी करण्यात यावी. प्रत्येक वाहनाची हालचाल व्यवस्थित तपासणी करून सर्व वाहनांचा तपशील नोंदवावा. कोणत्याही प्रकारच्या अवैध मालाची तस्करी होत असल्याचे आढळून आल्यास तो तात्काळ जप्त करून ताब्यात घेऊन कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी. महसूल विभाग, पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग आणि वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांना एकमेकांशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना दिल्या.
चेकपोस्ट सुरळीत चालण्यासाठी तीन शिफ्टमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चेकपोस्टवरील अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करू नये. कोणतीही चूक होऊ न देता काळजीपूर्वक वागण्यास सांगितले. त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हजेरी तपासल्या. यावेळी पोलीस अधिकारी व इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments