- जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे आवाहन
- जि. पं. कार्यालयात दलित नेत्यांची बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करून बाबू जगजीवन राम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करा असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले.
बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात जिल्ह्यातील दलित नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी उपस्थित दलित नेत्यांना संबोधित करताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या स्थितीत निवडणूक निश्चित होऊन आचारसंहिता जारी झाल्यास दि. ५ एप्रिल रोजी असलेली बाबू जगजीवन राम आणि दि. १४ एप्रिल रोजी असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निवडणूक काळातच होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार या काळात कोणत्याही राजकीय पक्षांनी आमिष दाखवू नये, राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे बॅनर लावू नयेत असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. जर तुम्हाला तुमचे बॅनर लावायचे असतील तर त्यासाठी रीतसर परवानगी घ्या, मिरवणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य व सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमानुसार मिरवणूक काढून शांततेत पार पाडावी, अशी सूचना बेळगाव शहर पोलीस आयुक्त एम.बी.बोरलिंगय्या यांनी केली.
या बैठकीत वाढदिवस साजरा करण्यासाठीच्या नियमावलीबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शन केले. यावेळी भीमज्योती मिरवणूक व कार्यक्रम साजरे करण्याबाबत चर्चा झाली. जिल्हा प्रशासन पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे मात्र आचारसंहिता पाळून दोन्ही जयंती साजऱ्या कराव्यात असे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीला जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, दलित नेते व विविध दलित संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments