- दारूचे ३०१ बॉक्स अधिकाऱ्यांनी परस्पर हडपले
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील मोदेकोप क्रॉसजवळ आठ दिवसांपूर्वी अबकारी अधिकाऱ्यांनी गोवा बनावटीची दारू जप्त केली होती. या साठ्यातील सुमारे ३०१ बॉक्स दारू साठा अधिकाऱ्यांनी हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यासंबंधी अबकारी निरीक्षकासह ५ जणांना निलंबित करण्यात आले आहे. मंगळवार दि. ७ मार्च रोजी दुपारी जांबोटी - खानापूर मार्गावरील मोदेकोप क्रॉस नजीक GJ १० टीटी ८२७६ क्रमांकाचा १२ चाकी कंटेनर अडवून तपासणी करण्यात आली असता या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली होती. वाहन चालक चंद्रकांत गजेंद्र शेरे (वय २७) रा. उडेगाव, ता. परांडा, जि. धाराशिव (उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली आहे.
या वाहनातून ४५२ बॉक्स इम्पिरियल ब्लू व्हिस्की जप्त करण्यात आल्याची माहिती अबकारी अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात या वाहनात ७५३ बॉक्स इतका दारू साठा होता. या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. मात्र,जप्त दारू साठा अधिकाऱ्यांनीच हडप करून खानापूर विभागीय कार्यालयात २०२ बॉक्स व सुरल येथे ९९ बॉक्स काढून ठेवण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा साठा ताब्यात घेतला आहे. यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
0 Comments