• ४० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये एक खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. बेंगळूर जल आपूर्ती आणि सिवरेज बोर्ड (बीडब्ल्यूएसएसबी) चे मुख्य लेखापाल प्रशांत मदल  यांना कर्नाटक लोकायुक्तच्या अधिकाऱ्यांनी  ४० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. प्रशांत हे  चन्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदाराचे सुपुत्र आहेत. मदल विरुपक्षप्पा हे येथील आमदार असून प्रशांत हे त्यांचेच चिरंजीव आहेत. त्यामुळे आमदारांच्याच मुलाने ४० लाख रुपयांचे लाच घेतल्याने भाजपसाठी ही मोठी अडचण ठरू शकते.

कर्नाटकमध्ये सध्या भाजपचे सरकार असून विरोधकांकडून सातत्याने भाजप नेत्यांवर लाचखोरी आणि टेंडर मध्ये टक्केवारी, पैशांच्या अफरातपरीचा आरोप केला जात आहे. प्रशांत यांनी एका टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ८० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ४० लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना  लोकायुक्त पोलिसांनी प्रशांत यांना  ताब्यात घेतले. लोकायुक्तांकडून आता या घटनेची व कागदपत्रांची सखोल चौकशी सुरू आहे. कर्नाटक साबण आणि डिटेर्जेंट लिमिटेडला   (केएसडीएल) बोर्डासाठी कच्चामाल पुरवठा करण्याच्या काढलेल्या निविदा प्रक्रियेवरून याबाबत तक्रार करण्यात आली होती. प्रशांत चे वडील आमदार मदल विरूपक्षप्पा हे केएसडीएलचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे याप्रकरणी संबंधित अधिकारी भाजपा आमदार विरुपक्षप्पा यांचीही चौकशी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान पुढील वर्षी कर्नाटकात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदाराच्या मुलावर करण्यात आलेली ही कारवाई भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. तसेच भाजप नेत्यांवर या प्रकरणामुळे नामुष्की ओढावली आहे. लोकायुक्तांनी सांगितले की, आरोपीने लाच म्हणून ८० लाख रुपये घेताना त्यांना अटक करण्यात आली. प्रशांत हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सल्लागारही राहिले होते. एसीबी बंद झाल्यानंतर त्यांनी लोकायुक्त मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र त्यांना यश आले नाही.