• बेळगावातील युवा क्रांती मेळाव्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आवाहन  
  • कर्नाटकातील भाजप सरकारवर केली सडकून टीका 

बेळगाव / प्रतिनिधी 

राज्यातील जनतेला आता बदल हवा आहे. गरीब, कष्टकऱ्यांच्या हक्काचे काँग्रेस सरकार आणण्याचा निर्धार जनतेने केला आहे. तेव्हा येत्या निवडणुकीत काँग्रेसला विजयी करा असे आवाहन काँग्रेस नेते  राहुल गांधी यांनी केले.  बेळगावातील सीपीएड मैदानावर काँग्रेसतर्फे भव्य युवा क्रांती मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी  मोठ्या  संख्येने उपस्थित युवक-युवतींना संबोधित करताना ते  बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल, प्रदेश प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, सलीम अहमद, ईश्वर खांडरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते बी. के. हरिप्रसाद, ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे, काँग्रेस प्रचार समिती अध्यक्ष एम. बी. पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, राज्याध्यक्ष महंमद नलपाड, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, आ. लक्ष्मी हेब्बाळकर, आ. अंजली निंबाळकर यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

यावेळी भाजपवर टीका करताना ते पुढे म्हणाले, कर्नाटकातील भाजप सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट ४० टक्के कमिशनचे सरकार आहे. ते युवा वर्गाच्या भविष्याशी खेळत असून काँग्रेस सत्तेवर आल्यास बेरोजगार पदवीधर युवकांना दोन वर्षांपर्यंत दरमहा ३००० रुपये त्याचप्रमाणे डिप्लोमाधारक बेरोजगारांना युवकांना दरमहा १५०० रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात येईल त्याशिवाय कर्नाटकमध्ये रिक्त असलेल्या अडीज हजार पदांवर युवकांची भरती करण्यात येईल, पाच वर्षांत राज्यात दहा लाख युवकांना नोकऱ्या देऊ अशी घोषणा त्यांनी केली.

काही महिन्यांपूर्वी मी कारतकातून भारत जोडो यात्रा केली. त्या यात्रेला कर्नाटकातील युवक, महिला, आबालवृद्धांनी भरभरून प्रतिसाद दिला. संपूर्ण देशात भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद, समर्थन लाभले. या यात्रेने भारत हा शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, महिला, युवकांचा देश असल्याचा संदेश दिला. आम्ही एकमेकांशी असहिष्णूतेने नाही  तर बंधुभावाने राहू असा संदेश दिला.

कर्नाटकात या यात्रेने ४ संदेश दिले. युवकांनी प्रामुख्याने नोकऱ्या नसल्याची तक्रार माझ्याकडे केली. जनतेने दुसरा संदेश दिला की, कर्नाटकातील सरकार ४० टक्के कमिशनचे भ्रष्ट सरकार असल्याचा संदेश दिला. म्हैसूर सॅन्डल सोपमध्ये भ्रष्टाचार होतो, भाजप आमदाराच्या मुलाकडे ८ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड सापडते. पण भाजप सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे हे सरकार देशातील भ्रष्ट सरकार असल्याचे मी नव्हे तर हजारो युवकांनी सांगितले असे राहुल गांधी म्हणाले. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार संपूर्ण देश अदानींना विकत सुटले असून सगळी विमानतळे, बंदरे, कंपन्या सरकार त्यांच्या ताब्यात  देत आहे. हे मी संसदेत जाहीरपणे  सांगितले आहे.  केंद्रातील भाजप सरकार आपल्या मित्रांना पुरेपूर फायदा करून देत आहे. हेच कर्नाटकातही सुरु आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आदींची भाषणे झाली. या सर्वांनीच भाजपवर घणाघाती  टीका केली तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताने राज्यात सत्तेवरील असा विश्वास व्यक्त केला.

या युवा क्रांती मेळाव्याला बेळगाव जिल्ह्यासह, हुबळी-धारवाड, कारवार आदि जिल्ह्यातील युवा काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

  •  राहुल गांधी यांनी युवा क्रांती मेळाव्यात केलेल्या घोषणा 
  • काँग्रेस सत्तेवर आल्यास ५ वर्षात १० लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार 
  • बेरोजगारांना २ वर्षांसाठी दीड हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत मासिक भत्ता देण्यात येईल
  • सरकारी कोट्यातील नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील
  • दोन हजार युनिट मोफत वीज तसेच बीपीएल कार्डधारकांना १० किलो मोफत तांदूळ दिला जाईल
  • आरक्षणाची मर्यादा वाढवली जाईल