• विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यातील यरगल (बी.के.) गावानजीक घटना 

विजयपूर / वार्ताहर

ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी वरील तिघेजण जागीच ठार झाले. विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यातील यरगल (बी. के.) गावानजीक मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. महांतेश हडपद (वय २७), सद्दाम बंदेनवाज नायकोडी (वय २७), मंजुनाथ दोडमनी (वय २४) तिघेही (रा. बी. बी. इंगळेश्वर,ता. देवरहिप्परगी , जि. विजयपूर ) अशी मृतांची नावे आहेत.


याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार महांतेश, सद्दाम व मंजुनाथ हे तिघे अमावस्येनिमित्त अफजलपुर तालुक्यातील गत्तरगी येथे देव दर्शनाला गेले होते. देवदर्शनाहून परतताना यरगल (बी. के.) गावानजीक दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने सिंदगीच्या दिशेने निघालेल्या ट्रकला धडक बसून हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच सिंदगी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आणि उत्तरीय तपासणीसाठी सिंदगीच्या सरकारी रुग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद सिंदगी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.