बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावातील भरतेश एजुकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डाण्णावर यांचे गुरुवार दि. २ मार्च रोजी रात्री ११. ३० वा निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे, दोन भाऊ व मोठा परिवार आहे.
त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी भरतेश एजुकेशन ट्रस्ट येथे शुक्रवार दि. ३ मार्च रोजी सकाळी ८. ३० ते १०. ३० पर्यंत व त्यानंतर त्यांच्या हिंदवाडी येथील घरी दु. १२ पर्यंत ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार शुक्रवार ३ मार्च रोजी दु. १ वाजता शहापूर स्मशानभूमीत होणार आहेत.
काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते कोमलण्णा दोड्डाणांवर यांचे पुत्र असणारे राजीव यांनी समाजातील अनेक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला. भारतीय जैन संघटनेचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ जैन एजुकेशन इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष तसेच कमलबस्ती पूजा कमिटीचे ते अध्यक्ष होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या पुढाराखाली बेळगावात महावीर जयंतीचे थाटात आयोजन केले जात आहे. २००५ साली तरुण सागर महाराज यांचा चातुर्मास बेळगाव येथे आयोजित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच कसमळगी येथे सापडलेल्या ११ व्य शतकातील पार्श्वनाथ भगवान यांच्या मूर्तीसाठी तिथे भव्य बस्ती बांधण्यात त्यांनी पुढाकार घेतला. भरतेश मधील त्यांच्या ३० वर्षांहून जास्त कारकिर्दीत त्यांनी अनेक नव्या व क्रांतिकारी योजना राबवून शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. राजकारण, तंत्रज्ञान, क्रीडा, साहित्य, धर्म, शिक्षण अशा अनेक विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. एस. आय. टी. तुमकूर येथून अभियांत्रिकी शिक्षण घेताना त्यांनी विद्यापीठाचे क्रिकेटमध्ये नेतृत्व केले होते.
0 Comments