• रेल्वे विभागाच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा

बेळगाव / प्रतिनिधी

एकेकाळी घराच्या चार भिंतीत 'चुल आणि मुल' सांभाळत संसार करणाऱ्या महिला आज खऱ्या अर्थाने पुरुषांच्या बरोबरीने देशसेवा, राजकारण, उद्योग, व्यवसाय,नोकरी यासह इतर  सर्वचं क्षेत्रात पुढे आहेत. त्यामुळे महिलांचा आदर करण्याबरोबरच त्यांनी हे कार्य अविरत सुरू ठेवावे असे मत खा. मंगला अंगडी यांनी व्यक्त केले. रेल्वे विभागाच्यावतीने काल बुधवारी  जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी रेल्वे विभागाचे मुख्य तिकीट निरीक्षक सुनील आपटेकर, प्रकाश गस्ती, सुप्रिया, अनिल कुमार, प्रभाकर देसाई हे उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक सुनील आपटेकर यांनी केले. त्यानंतर उपमुख्य तिकीट निरीक्षक बी. रुकसाना, श्रीमती मेरी आणि रेल्वे कर्मचारी मार्गारेट यांच्या हस्ते महिला दिनानिमित्त खासदार मंगला अंगडी यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना खासदार अंगडी यांनी आपल्या समयोचित भाषणात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला देखील आघाडीवर असल्यामुळे महिलांना कमी लेखू नये असे सांगून उपस्थित रेल्वेच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास बेळगाव रेल्वे स्थानकावरील अधिकारी व कर्मचारीवर्गासह हितचिंतक उपस्थित होते. शेवटी मुख्य तिकीट निरीक्षक सुनील आपटेकर यांनी सर्वांचे आभार मानले.