हुबळी / वार्ताहर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील हुबळी (जि. धारवाड) येथील जगातल्या सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म चे लोकार्पण केले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचीही उपस्थिती होती. कर्नाटकाच्या हुबळीतील जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्मची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. कर्नाटकातील श्री सिद्धारूढ स्वामीजी रेल्वे स्थानकावर हा प्लॅटफॉर्म बांधण्यात आलेला आहे. या प्लॅटफॉर्मसाठी २०.१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

सिद्धारूढ स्वामी रेल्वे स्थानकावरील हा प्लॅटफॉर्म दीड किलोमीटर अंतराचा आहे. या प्लॅटफॉर्मचे बांधकाम फेब्रुवारी २०२१ मध्ये सुरू करण्यात आले होते. हुबळी येथील हे जंक्शन बेंगळूर, होस्पेट  आणि वास्को-द-गामा या ठिकाणांशी जोडले गेलेले आहे. हुबळी रेल्वे स्थानकात वाढत असलेली गर्दी पाहून आणखी तीन प्लॅटफॉर्म येथे बांधण्यात आले आहेत.

प्लॅटफॉर्म क्रमांक ८ हा १५०७ मी. आहे. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जात आहे. इलेक्ट्रिक इंजिन असलेल्या दोन रेल्वे गाड्या एकाच वेळी या लांब प्लॅटफॉर्मवरून मार्गस्थ होऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्लॅटफॉर्मच्या लोकार्पणासह ११८ किमी लांबीच्या बेंगळूर - म्हैसूर एक्सप्रेस वे चे ही उद्घाटन केले. या महामार्गासाठी ८४८० कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. त्यामुळे तीन तासांच्या प्रवासाचा वेळ ७५ मिनीटांवर येणार आहे.