- बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक घटना
बेळगाव / प्रतिनिधी
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी स्त्री खंबीरपणे उभी असते असे म्हटले जाते, मात्र कर्जबाजारी पती घर सोडून निघून जाताच जगण्याची उमेद गमावलेल्या महिलेने नैराशेतून स्वतःच्या तिन्ही मुलींसह विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय महिलादिनीचं बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ही धक्कादायक घटना घडली.
सरस्वती हंपन्नावर (रा. बैलहोंगल जनता प्लॉट जि. बेळगाव) या महिलेने स्वतःच्या सृष्टी (वय १४), साक्षी (वय ८) आणि सान्वी (वय ३) तीन मुलींसह फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, अदृश्यप्पा हंपन्नावर हा अनेक वर्षांपासून बेळगावच्या अनगोळ येथील एका सलून मध्ये काम करत होता. येथेच पत्नी सरस्वती आणि आपल्या तिन्ही मुलींसह एका भाडोत्री खोलीत त्याचा संसार सुरू होता. मध्यंतरी अदृश्यप्पाने मोठे कर्ज घेतले होते. मात्र ते फेडून शकल्याने १५ दिवसांपूर्वी पत्नी आणि तिन्ही मुलींना एकाकी सोडून तो घराबाहेर पडला. त्यामुळे घासभर अन्नाला महाग झालेल्या सरस्वतीने आपल्या तिन्ही मुलींसह थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेची चौकशी केली असता, मोठी मुलगी सृष्टीने आईने स्वतः कोणता तरी रस प्राशन करून तो आम्हा तिघी बहिणींनाही पाजला असल्याचे सांगितले. तोपर्यंत सरस्वती आणि त्या तिन्ही मुलींना उलट्या होऊ लागल्या.
यावेळी सतर्क झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयानजीकच्या पोलिसांच्या मदतीने सरस्वतीसह तिच्या तिन्ही मुलींना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सरस्वती आणि तिच्या तिन्ही मुलींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता जिल्हा प्रशासन त्यांना काय मदत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेची नोंद बेळगाव मार्केट पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments