• चेअरमन रमेश वामनराव मोदगेकर यांची पत्रकार परिषदेत


बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑप. सोसायटीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजी साजरा केला जात असून यानिमित्त त्या दिवशी दुपारी ४.३० वा. गोवावेस  येथील रेल्वे ओव्हर ब्रिज नजीकच्या मराठा मंदिरे ते सुवर्ण महोत्सवी सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती  सोसायटीचे चेअरमन रमेश वामनराव मोदगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील, महाराष्ट्र राज्याचे निवृत्त पणन संचालक व अतिरिक्त आयुक्त दिनेश ओऊळकर, सहकारी संघाचे संयुक्त निबंधक जी. एम. पाटील, उपनिबंधक एम. एन. मणी, सहाय्यक निबंधक रवींद्र पाटील व प्रमुख वक्ते म्हणून गडहिंग्लजचे प्रा.  दत्ता पाटील व प्रा. आनंद मेणसे उपस्थित राहणार आहेत.

पारदर्शक कारभार आणि उत्तम ग्राहक सेवेद्वारे बेळगाव तालुका रुरल  इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात विश्वासार्हता जपली असून जिल्ह्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे असेही रमेश मोदगेकर यांनी सांगितले.

सोसायटीची स्थापना १९७० साली झाली. शहरातील जुन्या पुणे - बेंगळूर रोडवर त्यावेळी मोटार बॉडी बिल्डिंग व त्याला पूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात होता. श्री शिवजयंती उत्सव बेळगावचे पूर्वीपासून मोठे आकर्षण आहे. जिजामाता चौकातील शिवाजी कंपाउंड मध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने त्याकाळी काही व्यावसायिक एकत्र आले. याच सुमारास तत्कालीन कर्नाटक राज्य सरकारने प्रत्येक तालुक्यात सहकारी तत्त्वावर औद्योगिक पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या व्यवसायिकांनी आपली पतसंस्था स्थापन करून व्यवसाय वृद्धिंगत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते  कै. लक्ष्मण (पामा) आजगावकर , माजी आमदार कै. बापूसाहेब महागांवकर व मराठा बँकेचे संचालक कै. रामचंद्र राव (तात्या) ताशिलदार यांनी पुढाकार घेतला आणि आवश्यक कागदपत्रे तयार केली. तसेच भाग भांडवल जमा करण्यासाठी नोंदणी करून घेतली. सोसायटीच्या पहिल्या कार्यकारणीत वसंतराव परुळेकर हे संस्थापक - अध्यक्ष आणि अनंत पावशे हे  उपाध्यक्ष होते.  संचालक मंडळात यशवंतराव हंगिरगेकर, राणोजी रेडेकर, वामनराव हलगेकर, धुंडीराज डोंबले, यशवंतराव किल्लेकर, मारुतीराव चौगुले, वामनराव मोदगेकर  व अर्जुनराव जाधव यांचा समावेश होता. सुरुवातीला सोसायटीचे कार्यालय संस्थापक संचालक यशवंतराव हंगिरगेकर  यांच्या यशवंत टिंबर डेपो च्या जागेत होते. त्यानंतर शिवाजी कंपाउंड मधील एका इमारतीत जागा भाड्याने घेऊन तेथे कार्यालय सुरू केले. पुढे सोसायटीचा व्याप वाढला आणि जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे फुलबाग गल्ली येथे स्वतःच्या जागेत २३ लाख रुपये खर्च करून भव्य इमारत बांधण्यात आली आणि तेथे कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. आता शहरातील उद्यम भाग व ऑटोनगर या दोन औद्योगिक वसाहतीमध्ये सोसायटीच्या शाखा सुरू आहेत.  सोसायटी स्थापन झाली त्यावेळी सभासद संख्या १०५, भाग भांडवल  १३,०७० तर खेळते भांडवल २९,४६५ रु. होते. आता सुवर्ण महोत्सव साजरा झाल्यानंतर  यंदा सोसायटी ५३ वर्षात पदार्पण करत असून ३१ जानेवारी २०२३ अखेर सोसायटीची सभासद संख्या २८२८ आहे. भाग भांडवल १ कोटी ६८ लाख ३२ हजार रुपये, राखीव व इतर निधी ८ कोटी ७२ लाख ६५ हजार रु. ठेवी ४६ कोटी ९५ लाख ९० हजार रुपये, खेळते भांडवल ६० कोटी ९२ लाख ५८ हजार रुपये असून ३३ कोटी २१ लाख १४ हजार रुपयांची विविध कर्ज देण्यात आली आहेत असे सांगताना यंदाच्या अहवाल साली सोसायटीला ८९ लाख ५९ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, असे व्हा. चेअरमन रघुनाथ पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

बेळगाव तालुका रूरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने केवळ व्यवहार पाहिला नाही तर सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. लातूर येथे झालेल्या भूकंपावेळी भूकंपग्रस्तांना तसेच घटप्रभा येथील कर्नाटक आरोग्यधाम, बेळगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, वरेकर नाट्य संघ मराठा समाज सुधारणा मंडळ व इतर संस्थांना सोसायटीने आर्थिक मदत केली आहे. तसेच दहावी, बारावी व पदवी परीक्षेत उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या मुलांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याद्वारे प्रोत्साहित केले जाते. सभासदांच्या आरोग्याची काळजी घेताना या सोसायटीकडून गंभीर स्वरूपाच्या आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत दिली जाते. सोसायटीच्या मुख्य कार्यालयात ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. सोसायटीच्या या कार्याची दखल घेऊन बेळगाव जिल्हा औद्योगिक सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवाप्रसंगी उपराष्ट्रपती   बी. डी. जत्ती यांच्या स्त्रिया सोसायटीला आरोग्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते, असेही यावेळी सांगण्यात आले होते.

सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ज्येष्ठ सभासदांचा, सोसायटीच्या माजी कर्मचाऱ्यांचा, गुणीजनांचा सन्मान केला जाणार आहे. याशिवाय इतर काही कार्यक्रम राबविले जाणार आहेत असेही यावेळी सर्व व्यवस्थापक जयवंत लक्ष्मण खन्नूकर यांनी सांगितले.

सुवर्ण महोत्सवानंतर सध्या रमेश मोदगेकर (चेअरमन) आणि रघुनाथ पाटील (व्हाईस चेअरमन) यांच्या नेतृत्वाखाली मिलिंद पावशे, मारुतीराव सदावर, कृष्णराव मोदगेकर, यल्लाप्पा चौगुले, उदय किल्लेकर, नंदा बिर्जे, निर्मला कामुले हे संचालक कार्यरत आहेत.  त्यांना व्यवस्थापक जयवंत खन्नूकर  आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांची साथ लाभत आहे.