- एका अपघातातील जखमीचा ;दुसऱ्या अपघातात मृत्यू
सौंदत्ती / वार्ताहर
एका अपघातात जखमी झालेल्या तरुणाला उपचारांसाठी नेणाऱ्या रुग्णवाहिकेला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक बसून झालेल्या अपघातात स्ट्रेचरवरून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती नजीक बेळवडी येथेही घटना घडली. या अपघातानंतर मृत्यू अटळ असतो असे म्हणतात याचीच प्रचिती आली.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगरावर बांगड्या विकणारा 28 वर्षीय तरुण अकबरसाब हुसेनसाब नेसरगी हा सौंदत्तीकडे येत असताना त्यांची दुचाकी घसरल्याने गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सौदत्ती रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने बेळगाव येथे नेण्यात येत होते. याचवेळी सौंदत्तीजवळ बेळवडी क्रॉसजवळ एका उसवाहू ट्रॅक्टरने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. त्यामुळे रुग्णवाहिकेतील स्ट्रेचरवरून पडून अकबरसाबचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याची आई जन्नतबी, भाऊ मोहम्मद अली, रुग्णवाहिकेत असलेले नातेवाईक मेहबूबसाब शब्बीर नेसरगी हे या अपघातात जखमी झाले आहेत. या प्रकरणाची दोडवाड पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
0 Comments