- शेती व मिळकतीवरून होता वाद
बेळगाव / प्रतिनिधी
शेती व मिळकतीच्या वादातून बेकवाड (ता.खानापूर) येथे १८ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या यल्लाप्पा शांताराम गुरव (वय ३३,रा. बेकवाड, ता. खानापूर) खून प्रकरणात दोन महिला आरोपींना सशर्त जामीन मंजूर झाला आहे. येथील अकराव्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. जयश्री जक्काप्पा उर्फ राजू गुरव (रा.बेकवाड) व सुरेखा उर्फ सुजाता विनोद उर्फ संतोष कदम (रा. बिडी) अशी जामीन मिळालेल्या महिलांची नावे आहेत. जयश्री व सुरेखा यांनी बेळगाव येथील अकराव्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने प्रत्येकी ५०,००० रुपयांचा एक जामीनदार व तितक्याच रकमेचे हमीपत्र घेऊन जामीन मंजूर केला आहे.
जामीन मंजूर करताना तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याची तसेच या प्रकरणातील साक्षीदारांना न धमकावण्याची अट घातली आहे. सदर आरोपींच्या वतीने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर, ॲड. मारुती कामण्णाचे यांनी काम पाहिले. अस्मिता यल्लाप्पा गुरव यांनी नंदगड पोलीस स्थानकात नोंदविलेल्या फिर्यादीनुसार बेकवाड येथील शांताराम जक्काप्पा गुरव यांना दोन मुलगे व एक मुलगी आहे. शांताराम यांचा मोठा मुलगा जक्काप्पा उर्फ राजू व लहान मुलगा यल्लाप्पा (मृत) यांच्यात शेती व मिळकतीवरून वाद होता. १८ जानेवारी रोजी फिर्यादीचा पती यल्लाप्पा यांनी शेत जमिनीची वाटणी करूया असे आरोपी जक्काप्पा याला सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर आरोपी जक्काप्पा व त्याची पत्नी जयश्री यांनी यल्लाप्पा चा फोन करण्याच्या उद्देशाने बेकवाड हद्दीतील त्यांच्याच शेतात डोळ्यात मिरची पूड टाकून तलवारीने हल्ला केला खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अस्मिता यांच्या फिर्यादीवरून नंदगड पोलिसांनी जक्काप्पा गुरव, जयश्री गुरव, सुरेखा कदम यांच्यावर ३०२, २०१ सहकलम ३४ अन्वये गुन्हा नोंद केला होता. त्यांना अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली होती.
0 Comments