• मुतग्यानजीक रास्तारोको आंदोलन
  • रिंगरोडला इंच भरही जमीन न देण्याचा निर्धार

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव तालुक्यातील सुमारे ३४ गावातील सुपीक शेत जमीन संपादित करून रिंगरोड करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्या विरोधात आज म. ए. समिती, श्रीराम सेना हिंदुस्थान, राज्य रयत संघटना आदींच्या सहभागाने मुतग्यानजीक रास्तारोको आंदोलन करण्यात आले. रिंगरोडला इंच भरही जमीन न देण्याचा निर्धार करण्यात आला. 

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी ठाण मांडून बाची रायचूर राज्य महामार्ग रोखला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे , माजी महापौर शिवाजी सुंठकर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर, पुंडलिक पावशे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावर मतांची भीक मागून जे आमदार झाले आहेत. त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या एकाही आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांसह सर्वांनी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी.  कारण हे लोक शिवरायांचे विचार सांगतात मात्र शिवरायांच्या एकाही आदर्शाचे अनुकरण ते करत नाहीत असे कोंडुसकर यांनी स्पष्ट केले. यानंतर  माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, सुनील अष्टेकर, आर. एम. चौगुले, मनोहर किणेकर यांनीही रिंग रोड भूसंपादना विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या.

या आंदोलनात मुतगा व परिसरातील अनेक गावातील शेतकरी, महिला, शाळकरी मुले मुली आणि सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते.