संकेश्वर / वार्ताहर
गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले बेळगावचे माजी महापौर विजय मोरे यांनी पुणे - बेंगळूर महामार्गावर झालेल्या अपघातातील जखमीला मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी त्यांचे सुपुत्र ॲलन मोरे यांनीही मदत कार्यात सहभाग घेऊन वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक कार्यात पुढे येत असल्याचे दाखवून दिले.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, पुणे - बेंगळूर महामार्गावर सहा लेनचे काम सुरू असल्याने एका लेनवर संकेश्वरनजीक गर्दी वाढली असून वारंवार वाहतूक ठप्प होत आहे.आजही या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एक दुचाकी स्वार गर्दीतून निघून गेला. यावेळी त्याला समोरून येणाऱ्या ट्रकचा अंदाज आला नाही. त्याने ब्रेक लावून दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला पण दुचाकी थेट ट्रकच्या मागच्या टायरमध्ये शिरली. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला. अखेर काही लोकांनी त्याला ट्रक खालून बाहेर काढले.
याच सुमारास बेळगावचे माजी महापौर विजय मोरे यांची गाडी गर्दीतून घटनास्थळी दाखल झाली. कोल्हापूर येथील सावली केअर सेंटरचा हॅपी स्ट्रीट कार्यक्रम आटोपून ते बेळगावला परतत होते. अपघात व जखमी रस्त्यावर पडलेले पाहून त्यांनी तात्काळ गाडीतून उतरून धाव घेतली. जखमी व्यक्तीला धीर दिल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका बोलाविण्यात आली आणि त्याला त्वरित उपचार देण्यात आले.अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनीही बेळगावचे माजी महापौर तथा सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे आणि त्यांचे सुपुत्र ॲलन मोरे यांचे आभार मानले. जखमींना तात्काळ मदत मिळाल्याने महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूकही सुरळीत झाली. त्याबद्दल अनेक वाहनधारकांनी ही या दोघांना धन्यवाद दिले.
0 Comments