बेंगळूर दि. ७ फेब्रुवारी :
आमच्या सरकारने राज्यातील जनतेला आरोग्य, शिक्षण व अन्य सुविधा देण्यास प्राधान्य दिले आहे. यंदा १५ हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असून आणखी शिक्षक भरती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
बेंगळूरमध्ये विविध विकासकामांना चालना आणि शिक्षण सुविधेचे उदघाटन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, राज्यातील खासकरून बेंगळूर महापालिकेच्या सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यात आला आहे. आज त्या इतक्या उत्तम स्थितीत आहेत की, पालक स्वतःहून खासगी शाळा सोडून सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी धडपडत आहेत. तेथे विध्यार्थी आधुनिक आव्हानांना सामोरे जाण्याचे धडे गिरवताहेत. आमदार आणि मंत्र्यांनी शिक्षण व्यस्था सुधारण्यात रस घेतला आहे असे त्यांनी सांगितले.
आमचे क्लिनिक योजनेत गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना वेळीच आरोग्यसुविधा मिळण्यासाठी राज्यात शहरी भागात सुसज्ज प्रयोगशाळांसहित दवाखाने सुरु करण्यात आले आहेत. तेथे साध्या आजारांवर उपचार तसेच रक्तदाब, रक्तशर्करा तपासणीची सुविधा आणि औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. लवकरच तेथे टेलिमेडिसिन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डायलेसिस, केमोथेरपी, कॉक्लीअर इम्प्लांटसाठीही सरकार सुविधा देत आहे. ६० वर्षांवरील नागरिकांची नेत्र तपासणी मोफत करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. ऍसिड हल्ल्यातील जखमींच्या भरपाई रकमेत ३ हजारवरून १० हजारपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नागरिकांच्या मानसिक आरोग्य रक्षणासाठी निम्हान्सच्या मदतीने राज्यभरात मानसिक आरोग्य उपचार देण्यात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अध्ययावतीकरण करण्यासह महिलांसाठी स्वतंत्र ‘आयुष्यमती’ रुग्णालये सुरु करण्यात येत आहेत असेही बोम्मई यांनी सांगितले.
तुर्कीये येथे झालेल्या प्रलयंकारी भूकंपात राज्यातील कोणी नागरिक अडचणीत सापडल्याचे वृत्त नाही. जर कोणी तेथे अडकला असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिल्यास, त्यांना सुखरूप राज्यात परत आणण्यास सरकार पावले उचलेल असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.
0 Comments