• उद्या होणार यात्रा  :भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होणार  

गडहिंग्लज / प्रतिनिधी  

गडहिंग्लजला श्री काळभैरव देवाचा पालखी सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत  मोठ्या  उत्साहात पार पडला. सायंकाळी मिरवणुकीने पालखी डोंगराकडे रवाना झाली. उद्या (मंगळवार) यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.

सोमवारी सायंकाळी गडहिंग्लज शहरातील शिवाजी चौकातील मंदिरात श्री काळभैरी पालखी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली. पालखीचे पूजन पुजारी, प्रशासकीय अधिकारी व मानकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा पार पडला. 'चांगभलं'च्या गजरात व गुलालाची उधळण करत भाविकांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. मानाच्या सासनकाठ्यांना भाविकांनी गोंडे बांधून आपला नवस फेडला. यंदा मोठे गोंडे आकर्षण ठरले.  पालखी मार्गावर भाविकांनी आकर्षक रांगोळी काढली होती. नेहरू चौकात फुलांची काढलेली भव्य व आकर्षक रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरले. पालखी भोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 'चांगभलं'च्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करत भाविकांनी श्री काळभैरव पालखीचे दर्शन घेतले.

शिवाजी चौकातून पालखी नेहरू चौक, बाजारपेठ, वीरशैव चौकातून काळभैरी रोड वरून डोंगराकडे रवाना झाली. रात्री बारा वाजता श्री काळभैरवाची शासकीय पूजा होणार आहे, त्यानंतर पहाटे काकड आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे.