बेळगाव / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार दि. २७ रोजी बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी काही बसेस आरक्षित ठेवण्यात आल्याने बस सेवेवर परिणाम होणार आहे. उपनगर व लांब पल्ल्याच्या बससेवेत व्यत्यय निर्माण होणार आहे. बेळगावसह ४ आगारातून धावणाऱ्या ३५० बस बंद ठेवण्यात येणार आहेत. असे परिवहन महामंडळाने पत्रकाद्वारे कळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातून लाखो नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रत्येक गावातून खाजगी वाहनासह परिवहन बसेसही या कार्यक्रमासाठी आरक्षित केल्या आहेत.
परिवहन महामंडळाने बेळगाव शहर, ग्रामीण आणि आंतरराष्ट्रीय सेवेतील काही बसेस यासाठी राखीव ठेवल्या आहेत. सोमवारी कोल्हापूर, हुबळी, धारवाड, विजापूर, गुड्डापूर, बिडी, तोलगी, नेसरगी, गोकाक, हिडकल, पाच्छापूर, बैलहोंगल या गावांना बस धावणार नाहीत. उपनगरात धावणाऱ्या अनगोळ, वडगाव, वंटमुरी, कणबर्गी, रणकुंडये , चंदन होसूर, सुळेभावी , राणी चन्नम्मानगर, व्हीटीयू, होनगा, येळळूर, उचगाव, कल्लेहोळ, सुळेभावी, यरगट्टी, नेसरगी, कित्तूर, तुरमुरी, मुनवळी, यादवाड, बिदरभावी, चिखले, पारवाडसह रामदुर्ग, बैलहोंगल भागात धावणाऱ्या बस बंद ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात धावणाऱ्या बस देखील रद्द करण्यात आल्या आहेत. बेळगाव विभागाला २०० बसेसची कमतरता भासत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात बसेस आरक्षित झाल्याने कमी प्रवासी संख्या असलेल्या मार्गावरील बस फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.
0 Comments