येळळूर / वार्ताहर
रामदास भटकळ यांनी कस्तुरबा गांधी यांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या जगदंबा या नाटकाच्या एकपात्री प्रयोगात रोहिणीताईंनी कस्तुरबांची केलेली भूमिका लक्षणीय होती. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित खंडोबाचं लगीन या नाटकातील त्यांची मुरळीची भूमिकाही लक्षवेधी ठरली. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी कस्तुरीमृग, लपंडाव, लफडासदन, डंख, मित्राची गोष्ट, रथचक्र आदी नाटकांतून महत्त्वाच्या भूमिका केल्या. त्यांनी गुजराती व्यावसायिक नाटकांमधूनही भूमिका वठविल्या. सर्पनाद, अमे जीविये बेफाम, माणस होवानो मनेडंख, तहोमत अशी गुजराती नाटके त्यांच्या भूमिकेने गाजली. जयदेव व रोहिणी यांनी प्रयोगशील नाटके सादर करण्यासाठी मुंबई येथे ‘कलाश्रय’ ही संस्था काढली. नितिन सेन यांच्या बंगाली कथेवर आधारित अपराजिता हा जयदेवदिग्दर्शित एकपात्री प्रयोग आणि त्यातील रोहिणी यांची भूमिका अतिशय गाजली. हिंदी व मराठीमध्ये त्याचे अनेक प्रयोग झाले.
रोहिणीताईंनी पुढे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८), चक्र (१९८१), अर्थ (१९८२), सारांश (१९८४), अग्निपथ (१९९०) इ. चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अपत्यवियोगाचे दु:ख भोगणाऱ्या वयस्क जोडप्याची कथा असलेल्या सारांश या चित्रपटातील जोडप्यामधल्या पत्नीची संस्मरणीय भूमिका रोहिणीताईंनी केली. दाक्षिणात्य भाषेतील अनेक चित्रपट त्यांनी केले : कन्नड-मनेसूर्या; मलयाळम्-अच्युवेत्तन्ते वीडु (१९८७) आणि अग्निदेवता (१९९५); तेलुगू-सीतारामय्यगारी मनवरालु (१९९१); तमिळ-वसूल राजा एमबीबीएस (२००३) इत्यादी.
छोट्या पडद्यावरील ‘चार दिवस सासूचे’ ही रोहिणीताईंची मालिका अनेक वर्षे गाजली. त्यामधल्या त्यांच्या सासूच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातले. ‘होणार सून मी ह्या घरची’ ह्या मालिकेतील त्यांची भूमिकाही खूप गाजली. रोहिणी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. राज्य-नाट्यस्पर्धेमध्ये चार वेळा प्रमाणपत्र, रौप्यपदक असे अभिनयाचे पुरस्कार; कस्तुरीमृग या व्यावसायिक नाटकातील भूमिकेकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नाट्यदर्पण पुरस्कार अर्थ आणि अग्निपथ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर ॲवॉर्ड (अनुक्रमे १९८४ व १९९१); पार्टी (१९८४) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९८५); संगीत नाटक अकादमी ॲवॉर्ड (२००४); विष्णुदास भावे पुरस्कार (२०१९) असे विविध सन्मान त्यांना प्राप्त झाले. त्यांचा गांधी हा चित्रपट ऑस्करसाठी निवडला गेला. या चित्रपटातील कस्तुरबांच्या भूमिकेसाठी ब्रिटिश ॲकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्सतर्फे त्यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले (१९८२).
चित्रपट, नाटके, दूरदर्शन मालिका अशा विविध क्षेत्रांतील रोहिणीताईंच्या भूमिका प्रेक्षकांना नवनवीन आविष्कार दाखवीत आहेत. सुसंस्कृत, सुविद्य अशा या अभिनेत्रीचा अभिनय संपन्न आणि अभ्यासू आहे.
0 Comments