- तालुका म. ए. समिती बैठक संपन्न
बेळगाव / प्रतिनिधी
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज तुकाराम बँकेच्या सभागृहात समिती नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर हे होते. या बैठकीत 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 'चलो मुंबई' या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, 1956 सालापासून सीमाभागातील मराठी भाषिक न्याय्य मार्गाने सीमा प्रश्नासाठी आंदोलन करत आहेत. सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 28 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात झालेली सीमावासियांची सर्व आंदोलने यशस्वीरित्या पार पडली आहेत. याचप्रमाणे 28 फेब्रुवारीचे आंदोलन देखील अशाच पद्धतीने यशस्वी व्हावे, यादृष्टीने सर्व मराठी भाषिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. मुंबई आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागातील नेत्यांकडे लवकरात लवकर आपली नावे नोंदवावीत, शिवाय मुंबई आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन प्रत्येकाने शांततेत मोर्चाला जाऊन येणे गरजेचे आहे, असे मत मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले.
या बैठकीला माजी महापौर शिवाजी सुंठकर, ऍड. सुधीर चव्हाण, एम. जी पाटील, आर. के. पाटील, सौ. सरस्वती पाटील, आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, आदींसह अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments