सुळगा (हिं.) / वार्ताहर
बेनकनहळ्ळी हायस्कूलच्या मैदानावर यंदा पहिल्यांदाच आयोजित केलेल्या श्री नागेश मन्नोळकर पुरस्कृत 'मन्नोळकर चषक - २०२३' फ्रेंड्स ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आज सोमवारपासून मोठ्या प्रारंभ झाला.
सदर स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे पुरस्कर्ते हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर, माजी ग्रा. पं. अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर यांच्यासह प्रमोद पवार, विनय कुलकर्णी, युवराज अगसंगेकर, राजू काटकर, संतोष पिल्ले, फ्रँकी पिल्ले, काशीनाथ नाईक, विजय किल्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यष्टी पूजनासह श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यातील प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंचा पाहुण्यांशी परिचय करून देण्यात आला. त्यानंतर नाणेफेक होऊन सामन्याला सुरुवात करण्यात आली. उद्घाटनाचा सामना मराठा स्पोर्ट्स मण्णूर व ब्रम्हलिंग स्पोर्ट्स बेनकनहळ्ळी यांच्यात खेळविण्यात आला.
सदर स्पर्धेतील विजेत्या संघाला मन्नोळकर चषकासह १ लाख रुपये तर उपविजेत्या संघाला ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय आकर्षक वैयक्तिक बक्षिसेही पुरस्कृत करण्यात आली आहेत. येत्या शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून बक्षीस समारंभाने स्पर्धेची सांगता होणार आहे. या कालावधीत ३२ सामने खेळविले जाणार आहेत. सदर स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी क्रिकेटप्रेमींची बेनकनहळ्ळी हायस्कूल मैदानावर मोठी गर्दी होत आहे.
0 Comments