• कागवाड पोलिसांची कारवाई 
  • तब्बल ३६ मोटारींसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त 

बेळगाव / प्रतिनिधी 

कागवाड, शेडबाळ, शिरगुप्पी, मोळे परिसरातील विहिरी व नदी किनाऱ्यावर बसविलेल्या विद्युत मोटर चोरणाऱ्या  सांगली येथील त्रिकुटाला कागवाड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून  सुमारे ९ लाख  रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख  डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली. योगेश उर्फ  मल्लाप्पा ईश्वर  करोली उर्फ पाटील (वय ३३, मूळचा रा.अनंतपूर,सध्या रा.सांगली), सतीश विठ्ठल सूर्यवंशी (वय ४५, रा. कोल्हापूर रोड, सांगली), विजय ईश्वर भिसे (वय ३२, रा. हरिपूर रोड सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७ लाख रु. किमतीच्या  ३६ विद्युत मोटर जप्त करण्यात आले आहेत.

अथणीचे  पोलीस उपअधीक्षक  श्रीपाद जलदे, पोलीस निरीक्षक रवींद्र नायकोडी, कागवाड चे पोलीस उपनिरीक्षक एच. के. नरळे, एस. आर. नायकोडी यांच्यासह सहकाऱ्यांनी ही कारवाई केली

आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा ऐवज जप्त करणाऱ्या पोलीस पथकाचे जिल्हा पोलीस प्रमुखांनी कौतुक केले आहे.  सोमवार दि. २० फेब्रुवारी रोजी  ही कारवाई करण्यात आली. चोरीसाठी वापरलेले  १ लाख ९७ हजार रुपये किमतीचे मालवाहू वाहन असा ८ लाख ९७ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.