• अन्य चार ठिकाणी किरकोळ चोरीचा प्रकार 

कोगनोळी / वार्ताहर 

अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालून दोघांना जबर मारहाण करून दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना कोगनोळी येथील हणबरवाडी मार्गावर एका घरात घडली. दरोडेखोरांनी मारहाण केल्यामुळे सी. वाय. पाटील व मुलगी ऐश्वर्या घोरपडे गंभीररित्या जखमी झाले आहेत.


याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, कोगनोळी हणबरवाडी मार्गावरील  सी. वाय. पाटील यांच्या घरी शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मागील दाराचा कडी कोयंडा तोडून अज्ञातांनी घरात प्रवेश केला. स्वयंपाक खोलीतील साहित्य विस्कटून इतरत्र फेकून देत त्यातील मौल्यवान वस्तू घेतल्या. यानंतर चोरट्यांनी स्वयंपाक खोली नजीक असलेल्या खोलीत प्रवेश केला. यावेळी सी. वाय. पाटील, त्यांची पत्नी रेखा पाटील व मुलगी ऐश्वर्या घोरपडे हे झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी खोलीत प्रवेश करताच पाटील यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुलगी ऐश्वर्या वडिलांना मारहाण करत असल्याचे पाहून सोडवण्यासाठी गेली असता तिलाही चोरट्यांनी जबर मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. घरातील ३० तोळे सोने व रोख रक्कम घेऊन  चोरटे पसार झाले. चोरटे निघून गेल्यानंतर बाहेर येऊन  आरडाओरड केल्यावर शेजारील सर्वजण एकत्र झाले. यावेळी तात्काळ सी. वाय.पाटील आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या  यांना कागल येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. गंभीर दुखापत झाल्याने पाटील यांच्यावर  रुग्णालयात उपचार सुरू आहे.

माळी गल्लीतील सूर्यवंशी घरासह इतरत्र चोरीचा प्रयत्न
याच रात्री माळी गल्ली येथील संध्या सूर्यवंशी यांच्या घराची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि किरकोळ चोरी केली. तसेच याच गल्लीतील सदाशिव माळी यांच्या घराची कळी तोडून घरात प्रवेश करत चोरीचा प्रयत्न करण्यात आला. पण या दोन्ही ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. हणबरवाडी मार्गावर असणाऱ्या मारुती पाटील यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. या ठिकाणी चोरट्याने किरकोळ केली. इथूनच काही अंतरावर असणाऱ्या रावसाहेब धना पाटील  यांच्या घराचे दार मोडण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न निष्फळ ठरला.

घटनास्थळी चिकोडी उपजिल्हा पोलीस प्रमुख बसवराज यलगार, निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अनिल कुंभार  यांच्यासह अन्य पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

घटनास्थळी ठसेतज्ञ व श्वानाच्या मदतीने  
चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न
चोरीच्या घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. चित्रा या श्वानाने घटनास्थळापासून हणबरवाडी मार्गावर असणाऱ्या ढोबळे पाणंद येथील अशोक मगदूम यांच्या शेतापर्यंत चोरट्यांचा मार्ग दाखवला.

महिन्यात चोरीची दुसरी घटना 
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच हालसिद्धनाथ नगर येथील भोपाल कोळेकर  यांच्या घरी चोरी झाली होती. या ठिकाणी रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले होते. जानेवारी महिन्यातच कोगनोळी गावात चोरीची दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान
सुरुवातीला किरकोळ स्वरूपाच्या होणाऱ्या चोऱ्या मोठ्या स्वरूपात होऊ लागले आहेत. कोगनोळी येथे झालेल्या चोरीमध्ये मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने या चोरी प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी नागरिक करत आहेत.