येळ्ळूर / वार्ताहर
येळ्ळूर सर्वे नंबर 1142 मधील 49 एकर 13 गुंठे जागा गायरान म्हणून नोंद आहे. या सर्वे नंबर मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, मराठी प्राथमिक शाळा, दलित बांधवांची इंदिरा आवास योजना, येळ्ळूरला पाणीपुरवठा करणारी योजना, त्याचबरोबर हरी मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडांगणाचा घाट घातला आहे. सदर क्रीडांगणाला येळ्ळूरवासियांनी तीव्र विरोध केला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून सरकारचा क्रीडांगणाचा प्रस्ताव हाणून पडण्याचा निर्धार येळ्ळूर गाव कमिटी व येळ्ळूर ग्रामपंचायतीने बोलाविलेल्या बैठकीत करण्यात आला. बैठकीचे अध्यक्षस्थानी श्रीचांगळेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष श्री नारायण कंग्राळकर हे होते.
प्रारंभी येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे चिटणीस श्री. प्रकाश अष्टेकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. येळ्ळूर ग्रामपंचायतचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी ग्रामपंचायतीमध्ये क्रीडांगण विरोधी ठराव करून देखील आम्हाला पुन्हा नोटीस दिली परंतु आम्ही सदर क्रीडांगण कदापि होऊ देणार नाही असे सांगितले. येळ्ळूर गावामध्ये 25000 लोकसंख्या आहे. त्याचबरोबर जनावरे चारवण्यासाठी गायरान अतिशय महत्त्वाचे आहे. पेलूर मधून रिंगरोड करण्याचा घाट सरकारने घातला आहे त्यामुळे गावातील पिकाऊ जमीन व गायरान नष्ट होणार आहे. सदर प्रस्तावाला येळ्ळूर गावचा विरोध असल्याचे गावकन्यांनी विचार व्यक्त केले. या बैठकीत दुधाप्पा बागेवाडी, दत्ता उघाडे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, अशोक कोलकार, मधु कुगजी, मनोहर घाडी, क्रीडा शिक्षक नारायण पाटील, सतीश गणपत पाटील, आदी गावकऱ्यांनी विचार मांडले.
सदर बैठकीला विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, रमेश मेणसे, जोतिबा चौगुले, दयानंद उघाडे, रूपा पुण्यानवर, मनीषा घाडी, शालन पाटील, अनुसया परीट, वनिता परीट, राजू डोण्याणावर, विलास बेडरे, राकेश परीट, परशुराम परीट, तानाजी हलगेकर, भरत मासेकर, रमेश धामणेकर, परशुराम घाडी आदी गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments