- खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके यांच्याहस्ते उद्घाटन
बेळगाव - सिकंदराबाद - बेळगाव या मार्गावर रेल्वेसेवा सुरु करण्याची प्रवाशांची खूप दिवसांची मागणी होती. त्याची दखल घेऊन खा. मंगल अंगडी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने या रेल्वेसेवेला मंजुरी दिली. आज बेळगाव रेल्वे स्थानकावर खा. मंगल अंगडी, आ. अनिल बेनके यांनी श्रीफळ वाढवून, हिरवा झेंडा दाखवून या सेवेचे उदघाटन केले.
यानिमित्त प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. मंगल अंगडी म्हणाल्या, बेळगावातून हुबळी, गदग, बागलकोट, रायचूर, यादगिरी, मंत्रालय मार्गे सिकंदराबादला रेल्वे सुरु करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यामुळे मी पंतप्रधान मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. या रेल्वेचे आजचे बुकिंगही फुल्ल झाले आहे. बेळगावातून दुपारी १.१० वाजता ही ट्रेन सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३०ला सिकंदराबादला पोहोचेल. या नव्या रेल्वेमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
यावेळी बोलताना बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासूनची रेल्वे प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी खा. मंगल अंगडी यांनी प्रयत्न केल्याबद्दल मी त्यांचे तसेच पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे बेळगावकरांच्या वतीने आभार मानतो. महिन्यापूर्वी बेळगावातून आणखी एल रेल्वे सुरु करण्यात आली आहे. आता खा. मंगल अंगडी बेळगाव-पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी प्रयत्न करत आहेत. त्यातही यश येईल. जनतेने या नव्या रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खा. अंगडी यांनी रेल्वेस्थानकाच्या फेरफटका मारून तेथे सुरु असलेल्या विकासकामांची पाहणीही केली. भाजप महानगर सरचिटणीस मुरगेंद्रगौडा पाटील, प्रवीण पाटील, स्टेशन मास्तर डी. अनिलकुमार आदी उपस्थित होते.
0 Comments