बेळगाव / प्रतिनिधी 

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट जिल्हा रिटर्निंग ऑफिसरपुरस्कार बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना जाहीर झाला आहे. भारतीय निवडणूक आयोग आणि कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हा पुरस्कार जाहीर केला. मतदार नोंदणी आणि पुर्ननिरीक्षण यासह एकूणच निवडणुकीतील सर्वोत्तम कामगिरी लक्षात घेऊन हा पुरस्कार दिला जातो.

महामहिम राज्यपाल थावरचंद गेहलोत , बुधवारी ( २५ जानेवारी) दुपारी वाजता बेंगळूरच्या सर पुत्तन्ना चेट्टी टाऊन हॉल येथे आयोजित राष्ट्रीय मतदार दिनकार्यक्रमात पुरस्कार प्रदान करतील.

कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना आणि बीबीएमपीचे मुख्य आयुक्त तुषार गिरीनाथ उपस्थित राहणार आहेत.

त्याचप्रमाणे तुमकूर, यादगिरी आणि उडुपी जिल्ह्याच्या जिल्हा आयुक्तांनाही पुरस्कार देण्यात येत आहेत. याशिवाय विविध जिल्ह्यांतील निवडणूक निबंधक, सहाय्यक निबंधक, बूथ लेव्हल ऑफिसर, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवडणूक शाखेचे तांत्रिक कर्मचारी यांनाही स्वतंत्र श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर केले जातील.