बेळगाव / प्रतिनिधी
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोनवाळ गल्ली, बेळगाव येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरोळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी, अमर रहे, अमर रहे बाळासाहेब ठाकरे अमर रहे, बेळगाव, करावा, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, शिवसेना झिंदाबाद अशा घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस व माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी सीमाप्रश्न सुटावा, कर्नाटकात अन्यायाने डांबलेला बेळगावसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात यावा ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची अखेरपर्यंत इच्छा होती. एकजुटीने लढा देऊन हा प्रश्न सोडवून त्यांचे हे स्वप्न साकार करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. बाळासाहेब ठाकरे हे सीमावासियांचा बुलंद आवाज होते. त्यांच्या नेतृत्वाखाली १९६९मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शिवसेनेने ६७ हुतात्मे दिले. हा त्याग विसरता येण्यासारखा नाही. बेळगावसह सीमाभागाचा महाराष्ट्रात समावेश व्हावा हे त्यांचे स्वप्न होते. ते साकार करून सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करणे ही आपली जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, केवळ बाळासाहेब ठाकरे या दोन शब्दांतून आजही आम्हाला ताकद मिळते यावरून त्यांचे अफाट कर्तृत्व समजून घ्यायला हवे. त्यांच्या शब्दांची किंमत महाराष्ट्रातील नेत्यांच्या शब्दांना आली पाहिजे. कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर या ना त्या पद्धतीने अन्याय करते. येथे हुतात्मा दिन कार्यक्रमास बोलावलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी करते. अशा प्रसंगी आज बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते असे वाटते. आम्ही आमची रस्त्यावरची लढाई सीमाभागात सुरु ठेवूच, पण महाराष्ट्रातील नेत्यांनीही आवाज उठवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन शेळके त्यांनी केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरोळकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेवक रणजित चव्हाण-पाटील, माजी ता.पं. सदस्य सुनील अष्टेकर आदींनी विचार व्यक्त केले.
मनोज पावशे, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, माजी नगरसेवक दिलीप बैलुरकर, महेश तंकसाळी, रमेश माळवी, विनायक बेळगावकार, दत्ता पाटील, राजू कणेरी, बाळासाहेब डंगरले, विजय सावंत, प्रकाश हेबजी, विनायक पावशे यांच्यासह शिवसेना, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments