विजयपूर / वार्ताहर
विजयपूर ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या अंत्यदर्शनासाठी भक्तांची रीघ लागली आहे. विजयपूर शहरातील ज्ञानयोगाश्रमात सोमवारी सायंकाळी ६.०५ वा. त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर खुल्या वाहनातून विजयपूर येथील सैनिकी शाळेत त्यांचे पार्थिव हलविण्यात आले असून येथील व्यासपीठावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. जनतेला रांगेतून त्यांचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व व्यवस्था केली आहे. तर पार्थिवासमोर राष्ट्रध्वज लावून शासनानेही आदरांजली वाहिली आहे. अंत्यदर्शन घेताना भक्तांना अश्रू अनावर होत आहेत.
दरम्यान शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी चारही दिशांना महत्त्वाच्या मार्गांवर पार्किंग व्यवस्था केली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
विजयपूरसह बेळगाव, धारवाड हावेरी, गदग आणि बागलकोट आणि बागलकोट जिल्ह्यातील पोलीस तसेच भारतीय राखीव पोलीस दलाला बंदोबस्तासाठी विजयपूर मध्ये पाचारण करण्यात आले आहे. तीन जिल्हा पोलीस प्रमुखांवर सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अंत्यदर्शनाला येणाऱ्या जनतेसाठी आ. एम. बी. पाटील, बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सुमारे पाच ते सहा लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. याशिवाय विजयपूर मधील विविध संस्थांकडून पायी जाणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी अल्पोपहार आणि चहापानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
0 Comments