येळ्ळूर / वार्ताहर
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण अभियानांतर्गत बेळगाव जिल्ह्यात 5 ते 31 जानेवारीपर्यंत तिसऱ्या फेरीतील लाळ खुरकत लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून कर्नाटक सरकारच्या पशु संगोपन व वैद्यकीय सेवा विभाग मार्फत गुरुवारी येळ्ळूर येथे लाळखुरकत रोग नियंत्रण लसीकरणाला प्रारंभ झाला आहे.
लाळखुरकत हा विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजार असून गायी, म्हशीं मध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. लाळखुरकत रोगांमधील बाधीत जनावरांमध्ये ताप येणे, तोंडामध्ये किंवा जिभेवर फोड येणे, पायांच्या खुरामध्ये फोड येवून जखमा होणे, भूक मंदावणे, परिणामी दुग्ध उत्पादन कमी होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. विशेषत: ओढ कामाच्या जनावरांमधील उदा. ऊस वाहतुकीच्या बैलांची कार्यक्षमता मोठया प्रमाणात कमी होते. अतिगंभीर प्रसंगी जनावरें दगावण्याची संभावना असते. यामुळे मोठ्याप्रमणावर जनावरांची जीवित व शेतकऱ्यांचे वित्त हानी होण्याची संभाव असतो. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या हिताच्या दृष्टीने हे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे येळ्ळूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश बलगे यांनी सांगितले.
पशु संगोपन व वैद्यकीय सेवा खाते आणि येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारपासून चार दिवस सकाळी 7 ते 10 पर्यंत येळ्ळूर येथे रोज राष्ट्रीय रोग नियंत्रण अभियानांतर्गत लाळखुरकत रोग नियंत्रण लस देण्यासाठी पशु चिकित्सालयाचे डॉक्टर घरोघरी भेट देत देणार आहेत. येळ्ळूर येथील अंदाजे 1800 जनावरांना लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे. तसेच हे राष्ट्रीय लसीकरण विनामूल्य असल्याची माहिती डॉ. शैलेश बलगे यांनी दिली. लसीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतिश बाळकृष्ण पाटील यांनी सर्व शेतकरी आणि पशु पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी येळ्ळूर ग्रा. पं. सदस्य शिवाजी नांदुरकर, परशराम परीट आदिंसह पशु चिकित्सालयाचे डॉक्टर उपस्थित होते.
0 Comments