• राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन निबंध स्पर्धेत कु.यामिन खानम हिचे अभिनंदनीय यश 
  • प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजघाटवर झालेल्या सोहळ्यात सहभागी होण्याचे लाभले भाग्य 

(कु.यामिन खानम हिचा सत्कार करताना कंग्राळी, बी. के.
ग्रा. पं. च्या माजी अध्यक्षा सौ. संध्या चौगुले,
यांच्या समवेत यामिनची आई )
 फोटो सौजन्य :श्री. उमेश चौगुले कंग्राळी (बी.के.)

कंग्राळी (बी.के.) / उमेश चौगुले

देशभरात सर्वत्र दि.२३ जानेवारी २०२३ रोजी पराक्रम दिवस साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाने My Gov. च्या सहकार्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून  नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयावर घेतलेल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेत सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगाव, या शाळेची इयत्ता ८ वी तील विद्यार्थिनी कु.यामिन खानम हिने उल्लेखनीय यश संपादन केले असून देशातील सर्वोत्कृष्ट २५ निबंधांमध्ये तिच्या निबंधाची निवड झाली. या निवडीबद्दल तिला रु. ५००० रोख आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिक प्राप्त झाले आहे. हे यश प्राप्त केल्यामुळे तिला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दि. २५ जानेवारी रोजी दिल्लीतील पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमासह दि. २६ जानेवारी रोजी राजघाट वरील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात  सहभागी होण्याचे भाग्य लाभले. निबंध लेखनासाठी तिला शिक्षक आणि पालकांनी मार्गदर्शन केले होते.

(कु. यामिन खानम तिचे पेढा भरवून
कौतुक करताना
 कंग्राळी,बी. के.
ग्रा. पं. च्या माजी अध्यक्षा सौ. संध्या चौगुले )

या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी पालक आणि नातेवाईकांनी तिचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर झालेल्या निबंध स्पर्धेत यश प्राप्त करून यामिन खानम हिने शाळेसह कंग्राळी (बी. के) गावचे नाव उज्वल केल्याने कंग्राळी (बी. के) ग्रा. पं.च्या माजी अध्यक्षा संध्या चौगुले यांनीही तिचे कौतुक केले आहे.


सदर निबंध स्पर्धा देशभरातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थिनींसाठी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये (अंदाजे ५०० शब्द मर्यादा) आयोजित करण्यात आली होती. दि. ११ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत झालेल्या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर स्पर्धेत देशभरातून सुमारे ६५४८ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या सहभाग घेतला होता.