बेळगाव / प्रतिनिधी 
 
ज्योती महाविद्यालयात बारावीच्या वर्गात विविध शाखेत मराठी विषय घेऊन शिक्षण घेत असलेल्या तीन विद्यार्थिनींना शशिकांत सारडा शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी विज्ञान विभागातून पूजा विलास यमेटकर, वाणिज्य विभागातून श्रद्धा नागेश लोहार आणि कला विभागातून वैजयंती राजू गोरल या तीन विद्यार्थिनींची सारडा शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये असे शिष्यवृत्तीचे मानधन आहे.

शशिकांत सारडा हे सांगलीचे सुपुत्र असून सध्या ते अमेरिकेत संचालक-अभियंते म्हणून काम पाहतात. शशिकांत सारडा यांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. मराठीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांनी शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
मराठी भाषा प्रेरणा मंचचे अध्यक्ष गोपाळ रामचंद्र पाटील यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या योजनेसाठी ज्योती महाविद्यालयाचे प्राचार्य आर. डी. शेलार यांचे मोलाचेसहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले आहे.