• तिसऱ्या सामन्यात भारताचा ९० धावांनी विजय
  • विजयासह आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप 

इंदोर २४ जानेवारी : मंगळवारी इंदोर येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ९० धावांनी विजय मिळवला. भारताने या मालिकेत न्यूझीलंडचा दारुण पराभव केला असून मालिका विजयावर आपले नाव कोरले आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने हैद्राबाद येथे झालेला पहिला सामना १२ धावांनी जिंकला होता. तर रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यातही भारताने न्यूझीलंडला गुडघे टेकायला भाग पाडले आणि ८ विकेट्सने सामना जिंकला. त्यानंतर आजच्या तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.

तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली आणि न्यूझीलंड विरुद्ध प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघ मैदानात उतरला. सलामी फलंदाज शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा या दोघांनी तब्बल २०० हुन अधिक धावांची भागीदारी रचली. यावेळी रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी लागोपाठ शतक ठोकले. रोहित शर्मा याने ८३ चेंडूत १०० धावा केल्या. त्याने शतक ठोकत असताना ६ षटकार आणि ९ चौकार ठोकले.

बऱ्याच काळानंतर रोहित शर्माच्या बॅटमधून हे शतक निघाले असून हे वनडे मालिकेतील त्याचे ३० वे शतक आहे. युवा क्रिकेटर शुभमन गिल हा देखील थांबण्याचे नाव घेत नाही. रोहित पाठोपाठ शुभमनने देखील ७२ चेंडूत १०१ धावा केल्या. शुभमनने ७२ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकार ठोकत शतक पूर्ण केले.

शुभमन आणि रोहितनंतर हार्दिक पांड्या वगळता इतर कोणताही फलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. अखेर ९ विकेट्स गमावून भारतीय संघाने ३८५ धावा केल्या. भारताने न्यूझीलंडला विजयासाठी ३८६ धावांचे आव्हान दिले. परंतु न्यूझीलंड कडून डेव्हॉन कॉन्वेनं व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही.

डेव्हॉन कॉन्वेने १०० चेंडूत १३८ धावांची खेळी केली. भारतीय गोलंदाजांपैकी सर्वाधिक विकेट शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी काढल्या त्यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर युझवेंद्र चहल याने २ तर हार्दिक पांड्या आणि उमरान मलिक याने प्रत्येकी १ विकेट घेतल्या. ४१ वी ओव्हर सुरु होईपर्यंत भारताने न्यूझीलंडच्या सर्व खेळाडूंना बाद करून सामना ९० धावांनी जिंकला.

भारताने यापूर्वी श्रीलंके सोबत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही सर्व सामने जिंकून श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला होता. त्यानंतर लागोपाठ न्यूझीलंड सोबतच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही भारताने सर्व सामने जिंकून न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या या वनडे मालिकेत पहिल्या सामन्यात द्विशतकीय आणि तिसऱ्या सामन्यात शतकीय कामगिरी करणाऱ्या शुभमन गिल याला प्लेअर ऑफ द सिरीजने सन्मानित करण्यात आले. तर शार्दूल ठाकूर याला प्लेअर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आले.