- आमदार हसन मुश्रीफ व राजेश पाटील यांना विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा सल्ला
चंदगड / प्रतिनिधी
काही निमित्ताच्या माध्यमातून काहीवेळा भांड्याला भांड लागायचच त्यामुळे असलेले मतभेद दूर करून आमदार हसन मुश्रीफ व राजेश पाटील यांनी एकदिलाने काम करुन येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी दिला. हलकर्णी एमआयडीसीत रविवारी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित शेतकरी मेळावा व ट्राॅमा केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालयाच्या कोनशिला व भूमिपूजन करून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील होते.
कार्यक्रमाला खासदार संजय मंडलिक, आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, चंदगड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रामाप्पा करिगार, भिकू गावडे, बाबासाहेब पाटील, भैय्या माने, बाबासाहेब आसुर्लेकर, जयसिंग चव्हाण, तानाजी गडकरी, अभय देसाई आदी उपस्थित होते. आजरा तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई यांनी स्वागत केले. तालुका संघाचे संचालक जानबा चौगुले यांनी आपल्या प्रास्ताविकात शरद पवार कुटुंबियांचे तालुक्यावरील ऋण व्यक्त केले. त्यानंतर लोकनियुक्त सरपंच, सदस्यांचा तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती भरमाण्णा गावडा व हलकर्णीचे सरपंच राहूल गावडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल पवार यांच्याहस्ते त्यांचा सत्कार केला.
पवार पुढे म्हणाले की, चंदगड तालुक्याला निधी दिला हे माझं कर्तव्य असून यापुढेही त्याबाबतीत चंदगड, आजरा व गडहिंग्लजसाठी ह्यात करणार नसून आमदार राजेश पाटील यांच्या पाठीशी मी ठाम असून आमदार मुश्रीफांसह सर्वांनाचीच ताकद त्यांच्या पाठीशी कशी राहील. याकडे माझे यापुढे बारीक लक्ष राहील, त्यामुळे तुम्ही आमदार पाटील यांना पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.
पवार साहेबांचे धोरण तेच आमच्या आयुष्याचे तोरण
आमदार राजेश पाटील म्हणाले की, कोणी कितीही वावड्या उठवल्या किंवा मला राष्ट्रवादी काँग्रेस पासून दूर ढकलण्याचे काम केले तरी मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असून शरद पवारांचे धोरण हेच यापुढे आमच्या आयुष्याचे तोरण राहणार असल्याचे त्यांनी सांगताच जनतेने टाळ्या वाजवून त्यांना साथ दिली. खरं पाहता या मतदारसंघाचे माझ्यावर ऋण असून जनतेची गरज व आमदार पाटील यांच्या आग्रहामुळे कागलचे ट्राॅमा केअर सेंटर तालुक्याला मिळाल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले की, पाटील यांच्या रुपाने चंदगडला कार्यकुशल आमदार मिळाला असून त्यांना पुन्हा संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार पाटील खरंच भाग्यवान
आमदार पाटील हे खरंच भाग्यवान असून आधी महाविकास आघाडीच्या माध्यमातून व आता त्यांचे मेहुणे खासदार मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळेल त्यामुळे आमदारांबरोबरच तालुक्याचे भाग्य उजळेल, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हणताच एकच हशा पिकला.
0 Comments