बेळगाव / प्रतिनिधी

भरधाव टिप्परची ट्रॅक्टरला धडक बसल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला. संतोष महावीर हुडेद (वय 23, रा. विजयनगर हलगा) असे अपघातात ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. बुधवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ७ वा. सुमारास राष्ट्रीय महामार्गाजवळील  खमकारट्टी गावानजीक ही दुर्दैवी घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार संतोष हुडेद ट्रॅक्टर घेऊन आपल्या शेताकडे निघाला होता. राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या खडीने भरलेल्या भरधाव टिप्परने ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्यामुळे ट्रॅक्टर चालक संतोष हा रस्त्याकडेला फेकला गेला. यावेळी टिप्पर मधील सर्व खडी संतोष वर कोसळल्याने तो खडी खालीच गाढला गेला आणि जागीच गतप्राण झाला. टिप्परची धडक इतकी जोराची होती की ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडताच मोठा आवाज झाला. यामुळे येथून रहदारी करणारे  नागरिक घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी दाखल होताच नागरिकांना ट्रॅक्टर चालकाचा पत्ताच लागला नाही. परंतु थोड्या उशिरानंतर संतोष हा खडीमध्ये गाढला गेला आहे याची जाणीव होताच, आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला बाहेर काढले परंतु त्याचा मृत्यू झाला होता. सकाळी झालेल्या अपघाताची बातमी हलगा गावात वाऱ्यासारखी पसरली, यामुळे हलगा येथील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. मृत संतोष च्या पश्चात आजोबा आई-वडील एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे . उमद्या वयातच संतोष वर काळाने घाला घातल्यामुळे उपस्थित सर्वजण हळहळ व्यक्त करत होते. या घटनेची नोंद  हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.