बेळगाव / प्रतिनिधी

कोणत्याही नात्यातील कटुता संपवून, त्या नात्यात गोडवा निर्माण करणारा आणि नात्यातील गोडवा  वाढवणारा असा मकर संक्रांतीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. संक्रांती सणानिमित्त तिळगुळ खरेदी करण्यासाठी शहर बाजारपेठेत ग्राहक गर्दी करू लागले आहेत. 


वास्तविक १४ जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याचे उत्तरायण सुरु होते. या काळात थंडी असते. शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि स्निग्धता राखण्यासाठी तीळ हा महत्वाचा घटक असल्याने संक्रांतीला तिळगुळ दिला जातो .

यंदा १५ जानेवारीला मकर संक्रांती आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागातील बाजारपेठेचा आढावा घेतला असता. सर्वत्र तिळगुळाचे स्टॉल मांडण्यात आल्याचे दिसून आले. शालेय विद्यार्थिनी देखील तिळगुळ खरेदी करत असल्याचे पाहायला मिळाले. तिळगुळसहीत, लहान मुलांसाठी तिळगुळ वाटण्यासाठी रंगबिरंगी आकर्षक असे विविध आकारातील डबे, तिळाचे लाडू हलवा तसेच लहान मुलांना बोरन्हाण घालण्यासाठी हलव्याचे आकर्षक दागिने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


यावेळी विक्रेत्यांशी संवाद साधला असता, आमच्याकडे तिळगुळ , हलव्याचे दागिने , तिळगुळ वाटण्यासाठी डबे , तिळाचे लाडू सर्व काही उपलब्ध आहे. दोन दिवसांवर संक्रांती येऊन ठेपल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणावर तिळगुळ खरेदी करत आहेत. त्याचप्रमाणे हळदी-कुंकूला वाण देण्याची प्रथा असल्याने, महिलांकडून वाण देण्यासाठीच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. गत दोन वर्षात कोरोना महामारीमुळे सर्व सण - उत्सवांवर निर्बंध होते. याचा विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. मात्र यंदा कोणतीही निर्बंध नसल्याने सण - उत्सव पूर्वीप्रमाणे उत्साहात साजरे होत आहेत. परिणामी खरेदीचा ओघ वाढला असून आर्थिक उलाढाल वाढल्याने समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. 


यावेळी ग्राहकांशी संवाद साधला असता, संक्रांतीचा सण आम्ही खूप चांगल्या प्रकारे साजरा करतो. बाजारात खूप प्रकारचे तिळगुळ, लाडू विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. पूर्वापार चालत आलेल्या रूढी आणि परंपराचे आपण पालन केले पाहिजे. तिळगुळ सर्वांशी गोड बोलण्याचा आणि प्रेमाने रहाण्याचा संदेश देतो अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.


एकंदरीत संक्रांती सणाच्या निमित्ताने तिळगुळ खरेदीसाठी बेळगाव बाजारपेठेत गर्दी होत असून इंग्रजी नवीन वर्षातील हा पहिला सण साजरा करण्यासाठी शहरवासिय सज्ज आहेत.