बेळगाव : येथील प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने दुसरे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. उद्या शनिवार दि. २८ व रविवार दि. २९ जानेवारी २०२३ असे दोन दिवस महात्मा ज्योतिराव फुले साहित्यनगरी मराठी विद्यानिकेतन, बेळगांव येथे हे संमेलन होणार आहे. थोर क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी ' सत्यशोधक समाजा' ची  स्थापना केली. त्याला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत.  तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हौतात्म्यास ७५ वर्षे होत आहेत. यानिमित्त, या दोन महात्म्यांनी समाजाला काय दिले ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

यानिमित्त उद्या शनिवार दि. २८ जानेवारी रोजी पहिल्या दिवशी दुपारी ४ वा. कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. प्रा. चंद्रकांत पोतदार (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी, ता. चंदगड) हे या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर गझलकार श्री प्रसाद कुलकर्णी (संपादक प्रबोधन प्रकाशन ज्योती, इचलकरंजी) हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कवी संमेलनाच्या माध्यमातून परिसरातील कवींना आपल्या कवितांचे सादरीकरण करण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.

रविवार दि. २९ जानेवारी रोजी सकाळी १० वा. पहिल्या सत्रात संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. प्रा. प्रवीण बांदेकर (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, सावंतवाडी) हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर श्री. सुभाष ओऊळकर,(ज्येष्ठ उद्योजक व अध्यक्ष मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

दुपारी १२ वा. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. भारती पाटील, (प्रमुख, महात्मा गांधी अभ्यास केंद्र शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) यांचे गांधी का मरत नाही? या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात दुपारी ३ वा. सत्यशोधक समाजाची आजच्या काळातील उपयुक्तता या विषयावर परिसंवाद होणार आहे. यासाठी प्रा. डॉ. दत्ता पाटील गडहिंग्लज, श्री. प्रसाद कुलकर्णी इचलकरंजी हे वक्ते म्हणून लाभले आहेत. प्रा. जी. के. ऐनापुरे, कार्याध्यक्ष प्रगतिशील लेखक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. तर चौथ्या सत्रात दु. ४.३० वा. नीला आपटे, शिक्षण संयोजिका, मराठी विद्यानिकेतन, बेळगांव यांचा महात्मा गांधी यांचे भजने व गीते यावर आधारित संगीत कार्यक्रम होणार आहे.

तरी साहित्य संमेलनात सर्वांनी उपस्थित राहावे, अशी विनंती संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे, उपाध्यक्ष अनिल आजगांवकर, सेक्रेटरी कृष्णा शहापूरकर, सहसेक्रेटरी प्रा.अशोक अलगोंडी, यांच्यासह सर्व सदस्यांनी केली आहे. कॉ. कृष्णा मेणसे, ॲड. नागेश सातेरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन होणार आहे.