- खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
खानापूर / प्रतिनिधी
येत्या १७ जानेवारी रोजीच्या हुतात्मा दिनाला खानापूर तालुक्यातील सीमा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले.
तालुकाध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक येथे बैठक संपन्न झाली. प्रारंभी नूतन तालुकाध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे तसेच सचिव सीताराम बेडरे यांचा तालुका समितीच्या वतीने माजी आमदार दिगंबर पाटील, ज्येष्ठ सीमा सत्याग्रही पुंडलिक चव्हाण, मारुती परमेकर गोपाळ पाटील, मुरलीधर पाटील, पांडुरंग सावंत, प्रकाश चव्हाण रमेश धबाले, आबासाहेब दळवी आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना बाळासाहेब शेलार म्हणाले, सीमा प्रश्न मार्गी लावण्याच्या हेतूने पाठपुरावा करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी उपक्रम हाती घेण्यात यावेत. निरंजन देसाई म्हणाले चळवळीसाठी आता काटेरी वाट आहे. ही सर करण्याची ताकद मनात ठेवून जोमाने कामाला लागणे गरजेचे आहे.
यावेळी प्रकाश चव्हाण, रणजीत पाटील,आबासाहेब दळवी, रामचंद्र देसाई,सदानंद पाटील,अर्जुन देसाई, रमेश धबाले, पांडुरंग सावंत,माजी आमदार दिगंबर पाटील,पुंडलिक पाटील आदींनी विचार मांडले.शेवटी सचिव सीताराम बेडरे यांनी आभार मानले.
0 Comments