सौंदत्ती / वार्ताहर 

कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश  या राज्यातील लाखो भाविकांची आराध्य दैवता असलेल्या बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील  रेणुका देवीची शाकंभरी पौर्णिमा यात्रा आज शुक्रवारी साजरी होत आहे. शाकंभरी पौर्णिमा यात्रेनिमित्त लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत. आज शुक्रवारी पहाटे मान्यवरांच्या उपस्थितीत देवीला अभिषेक, पुजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

फोटो सौजन्य : श्री. कृष्णा कणबरकर
सिद्धकला फोटो स्टुडिओ ,सुळगा (हिं.) बेळगाव

गत दोन वर्षात कोरोना महामारीमुळे सौंदत्ती डोंगरावर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त डोंगरावर देवीची यात्रा साजरी करता न आल्याने भाविकांचा हिरमोड झाला होता. मात्र यंदा निर्बंध मुक्त यात्रा साजरी होत असून दर्शनासाठी देवीचे दरवाजे भाविकांसाठी खुले आहेत. परिणामी  लाखोंच्या संख्येने भाविक डोंगरावर दाखल झाले असून, उद-ग-आई उदच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीने सौंदत्ती डोंगर दुमदुमून गेला आहे.

फोटो सौजन्य : श्री. कृष्णा कणबरकर
सिद्धकला फोटो स्टुडिओ ,सुळगा (हिं.) बेळगाव
देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगानभाव परिसरातही पवित्र स्नानासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.


यंदा यात्रेसाठी गावागावातून भाविक स्वतःच्या वाहनांसह डोंगरावर गेले आहेत. तर खाजगी वाहने, परिवहन महामंडळाच्या बसेस, ट्रॅक्टर बैलगाड्या आणि इतर खाजगी वाहने ही डोंगरावर पाहायला मिळत आहेत. परिणामी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचबरोबर प्रचंड संख्येने आलेले भावी पाहता आवश्यक त्या सुविधाही अपुऱ्या पडलेल्या दिसून येत आहेत.