• हलकर्णी एमआयडीसीत ट्राॅमा केअर सेंटरचे भूमिपूजन
  • चंदगड तालुक्यातील जनतेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री पवार यांचा नागरी सत्कारही होणार    

चंदगड / प्रतिनिधी 

माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या दिनांक ८ रोजी चंदगड तालुका दौऱ्यावर येत आहेत. यावेळी हलकर्णी एमआयडीसीत होणाऱ्या ट्राॅमा केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन व कोनशिला समारंभ त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशी माहिती आमदार राजेश पाटील यांनी दिली आहे. 

या सुविधा तालुक्यात उपलब्ध करून देण्यात सर्वातोपरी सहकार्य केल्याबद्दल चंदगड तालुक्यातील जनतेच्यावतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागरी सत्कार होणार आहे. तसेच हलकर्णी औद्योगिक वसाहतीत शेतकरी मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर  नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सन्मानही होणार  आहे. 

महाविकास आघाडीच्या कालावधीत त्यांच्या माध्यमातून चंदगड मतदारसंघ विकास कामांसाठी ३५० कोटींचा निधी मिळाला. यासाठी आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश टोपे, आमदार जयंत पाटील यांचेही सहकार्य लाभले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र कोरोनामुळे विलंब झाला. तरीही दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान गेल्या मार्चच्या अर्थसंकल्पात समाविष्ट केले. तीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. पवार यांनी यापूर्वीही तालुक्याच्या विकासाला हातभार लावला आहे. पाटबंधारे प्रकल्पामुळे तालुक्यात सोळा लाख टन ऊस उत्पादन होत आहे. याचेच औचित्य साधून त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भिकू गावडे यांनी केले आहे.