बेळगाव / प्रतिनिधी 

जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीमने आयोजित केलेल्या नवीन वर्षातील पहिल्या आणि पाचव्या फोन-इन कार्यक्रमाला शनिवारी चांगला प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील जनतेने फोन करून आपल्या समस्या सांगितल्या.

शनिवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या फोन-इन कार्यक्रमात नेहमीप्रमाणे एसपी डॉ. संजीव पाटील यांनी, ‘सर्वाना  दूरध्वनीद्वारे संपर्क साधून समस्या सांगण्याचे आवाहन केले. त्यानंतर एकामागून एक अनेक लोकांनी फोन करून समस्या सांगितल्या. एसपी डॉ. संजीव पाटील यांनी लोकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या तातडीने सोडविण्याचे काम केले.

टिळकवाडी येथील एका महिलेने राहायला घर दिले असता, एकाने आमचे घरच विकले आहे. याबाबत जाब विचारला असता, आमच्यावरच गुन्हा दाखल केला आहे अशी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे  केली. त्यावर उत्तर देताना एसपींनी हे प्रकरण शहर पोलिस आयुक्तालयाकडे येत असल्याने त्यांच्या निदर्शनास आणून दिले जाईल, असे सांगितले.

रामदुर्ग तालुक्यात एका शिक्षकाने एसपींना फोन करून एका असहाय्य वृद्ध महिलेच्या घरी चोरी करण्यात आल्याची तक्रार केली. त्यावर उत्तर देताना एसपी म्हणाले, हे प्रकरण माझ्या लक्षात आहे. याच्या तपासासाठी यापूर्वीच एक पथक तयार करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे. घराच्या आजूबाजूच्या लोकांना वीज बिल आणि पाणी बिल देण्याच्या नावाखाली येणाऱ्या अनोळखी लोकांपासून सावध राहण्यास सांगा. तुमच्या घरात चोरी करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

मुडलगी तालुक्यातील औराडी गावात एक व्यक्ती ‘प्रेस’ लोगो लावून, पत्रकार असल्याचे सांगून औराडी गावातील लोकांना केवळ त्रास देत असून, पैसेही मागून धमकावत आहे. त्याच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार एका व्यक्तीने केली. असे काही लोक खऱ्या पत्रकारांचे नाव खराब करतील, अशी प्रतिक्रिया एसपी संजीव पाटील यांनी व्यक्त करून स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन त्याच्याविरोधात तक्रार दिल्यास कारवाई केली जाईल, असे सांगितले.

गदग तालुक्यात वाळूची अवैध वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. संबंधित विभागाला कळवून कारवाईची विनंती करूनही काही उपयोग झाला नाही अशी तक्रार एका नागरिकाने केली. यावर उत्तर देताना एसपी संजीव पाटील यांनी हे प्रकरण गदग एसपींच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले.

यावेळी पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, शरणबसप्पा अजुर, महादेव एसएम, बाळप्पा तळवार, विठ्ठल मादार आदी उपस्थित होते.