बेळगाव / प्रतिनिधी
आज साडेतीनशे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांच्या नसानसात भिनले आहेत. आपल्या जीवनात शिवरायांचे स्मरण केल्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकत नाही. त्यामुळे छ. शिवाजी महाराजांसाठी नो कॉम्प्रोमाईज ! असे उदगार कोल्हापूरचे माजी खासदार छत्रपती युवराज संभाजी राजे यांनी काढले.
होनगा (ता. बेळगाव) येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीच्या प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सतीश जारकीहोळी हे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्याची संधी लाभली हे भाग्य असून माझ्यासाठी हा अविस्मरणीय प्रसंग आहे असे सांगून युवराज संभाजीराजे पुढे म्हणाले, छ. शिवाजी महाराजांचा आपले राज्य सुराज्य व्हावे असा संकल्प होता. महाराजांचे आचार विचार आचरणात आणणे ही काळाची गरज आहे. महाराज जसे आत्मचिंतन करत होते तसे आपणही केले पाहिजे. ही सर्व शिवभक्तांची जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसे स्थापन केले, परकीयांना कसे परतावून लावले, अफजलखानाचा वध कसा केला अशी अनेक उदाहरणे मी देऊ शकतो . मात्र हा कार्यक्रम कर्नाटकात होत आहे म्हणून मी मुद्दाम सर्वांना महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची एक आठवण सांगतो. जेव्हा छ. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले. दक्षिण दिग्विजय हा फक्त कर्नाटक नव्हे तर खाली थेट तामिळनाडू- जिंजीपर्यंत होता. जेव्हा छ. संभाजी महाराज यांना मारले गेले. तेव्हा मराठा साम्राज्य ८ ते ९ वर्षे शिवरायांचे पुत्र छ. राजाराम महाराज यांनी जिंजी येथून चालवले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्र पुरते मर्यादित नव्हते तर देशभर त्यांचे कार्यक्षेत्र होते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, असे ते म्हणाले.
आज महाराजांच्या मूर्ती अनावरण सोहळ्यास बोलावून तुम्ही युवराज संभाजी राजांचाच नव्हे तर छ. शिवाजी महाराजांच्या घराण्याचा मानसन्मान केला आहे. आज साडेतीनशे वर्षे झाली तरी महाराज आपल्या सर्वांच्या नसानसात भिनलेले आहेत. आपल्या जीवनात शिवाजी महाराजांना स्मरण केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. असे सांगून या महिन्यात दोन वेळा कर्नाटकला भेट घेता आली याचा अत्यानंद होत असल्याचेही, माजी खासदार युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्यासपीठावर पंढरपूरचे सद्गुरु विठ्ठल (दादा) वास्कर महाराज, खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, डॉ. मनोहर पाटील, अभियंता एम. एम. मुतगेकर, मूर्तिकार जे.जे.पाटील आदि उपस्थित होते. प्रारंभी माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती आणि सद्गुरु वास्कर महाराज यांच्या हस्ते शिवमुर्तीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करून परिसर दणाणून सोडण्यात आला. या अनावरण सोहळ्यास गावातील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवरांसह होनगा ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य, गावातील संस्था व महिला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments