कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ १९ डिसेंबर रोजी आयोजित मराठी भाषकांचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला.
महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी मराठा मंदिर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे, मात्र अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तरी देखील महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी महामेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत, याची कल्पना पोलिसांना दिली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी, कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सीमावासियांच्या विरोधात आहे. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी आहे. कर्नाटक सरकार आमचे घटनात्मक हक्क डावलून कन्नड सक्ती करत आहे. मराठी भाषा संपविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यालाच आम्ही या महामेळाव्याच्या माध्यमातून विरोध दर्शविण्याचे काम करत आहोत असे सांगून महाराष्ट्रात जाण्याचा वज्रनिर्धार करण्यासाठी येत्या १९ डिसेंबरला होणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला मराठी भाषिक अधिकाधिक संख्येने उपस्थित राहतील याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीच्या सुरुवातीलाच दिवंगत ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले, कै. लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण, कै. डॉ. कोतापल्ले, यांच्यासह म. ए. समितीची संबंधित दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मनोहर किणेकर यांच्यासह सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, राजू पाटील, ॲड. राजाभाऊ पाटील, यशवंत बिर्जे, धनंजय पाटील, रणजीत चव्हाण- पाटील, एम.जी. पाटील यांनी बैठकीतील चर्चेत भाग घेतला. माजी नगरसेवक रणजीत चव्हाण-पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.
या बैठकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच बेळगाव तालुका म. ए. समिती आणि खानापूर तालुका म. ए. समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
दरम्यान उद्या बुधवारी सायंकाळी ५ वा. बेळगाव शहर म. ए. समितीची बैठक रामलिंगखिंड गल्लीतील रंगुबाई भोसले पॅलेस येथे होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते युवक आणि नागरिकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन म. ए. समितीतर्फे करण्यात आले आहे.
मराठी साहित्य संमेलनामध्ये सीमाभाग केंद्रशासित करण्याचा ठराव घेऊ नये
0 Comments