• नवीन वर्षाच्या स्वागताची शहरात जय्यत तयारी

बेळगाव / प्रतिनिधी 

सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी बेळगाव शहरात जय्यत तयारी सुरु आहे. यानिमित्ताने सकाळपासूनच बालचमू गल्लोगल्ली कोपऱ्यावर ओल्ड मॅनचे पुतळे उभारण्यात  व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले.


गेली दोन-तीन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे बेळगावकरांना नववर्षाचे स्वागत भव्य प्रमाणात करता आले नव्हते. त्यामुळे सगळ्यांचाच हिरमोड झाला होता. पण यंदा निर्बंधमुक्त न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत.


बेळगाव शहर आणि परिसरात ओल्ड मॅन उभे केलेले दिसून येत आहेत. बेळगावातील कॅम्प परिसरात तयार ओल्ड मॅन प्रतिकृती विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.


यंदा मध्यरात्री १ वाजेपर्यंत न्यू इयर सेलिब्रेशन करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टचा मनमुराद आनंद लुटण्याचा संकल्प युवकांनी केला आहे. बेळगाव शहरातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पार्टी हॉल्स, शहराबाहेरील लॉन्स देखील थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांसाठी सज्ज झाली आहेत. दरम्यान, नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तालयाने चांगलीच खबरदारी घेतली आहे. नेहमीच्या गस्ती पथकांव्यतिरिक्त पोलिसांची विशेष भरारी पथकेही तैनात ठेवण्यात आली आहेत. ही पथके शहर परिसरात फिरून परिस्थितीवर नजर ठेवणार आहेत.



थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन्ससाठी बेळगावकरांनी जोरदार तयारी केली असून नववर्षाची सुरवात निर्विघ्नपणे व्हावी हीच सगळ्यांची अपेक्षा आहे.