सुळगा (हिं.) / वार्ताहर

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना प्रत्येक गावात विकासात्मक कामे केली आहेत. विकासाच्या बाबतीत प्रत्येक गावाला मी समान न्याय दिला आहे. मतदारसंघाच्या विकासाबरोबरच महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे. महिलांच्या कल्याणासाठी मी नेहमीच कटिबद्ध असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हिंडलगा गावात महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमाचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या.

पुढे आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मतदार संघातील जनतेचे प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद यामुळे बेळगाव ग्रामीण मतदारसंघ राज्यात विकासाच्या बाबतीत आदर्श बनला आहे. आमदार नाही तर मतदारसंघाची कन्या म्हणून मी जनतेची सेवा करत आहे. आजवर अनेक संकटांचा सामना केला, गत दोन निवडणुकांमध्ये अपयश आले. तरी हार न मानता अपयशी यशाची पहिली पायरी म्हूणन जिद्दीने काम केले आणि जनतेने दर्शविलेल्या विश्वासामुळे आमदार होण्याची संधी लाभली, असे त्यांनी सांगितले.

मतदार संघातील महिलांना कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही सुविधांपासून वंचित ठेवता कामा नये, याबाबत महिलांना आवश्यक सुविधा व मदत देण्याचे काम सत्तेच्या पलीकडे जाऊन केले आहे. महिलांनी त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले तर योग्य प्रतिसाद दिला जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. यावेळी एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ आणि महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.