विजयपूर / दिपक शिंत्रे
नीट परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी कोट्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळूनही आर्थिक अडचणीमुळे प्रवेशासाठी धडपडणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना आर्थिक मदत करून केपीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष आणि बीएलडीई संस्थेचे अध्यक्ष आमदार एम. बी. पाटील एखाद्या देवदूतासारखे धावून आले आहेत.
विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील हुबनूर गावातील चन्नबसू माळी आणि सिद्धापूर गावातील शेम्मिर जातगार हे एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी आर्थिक अडचणींमुळे संघर्ष करत होते. या संदर्भात दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांनी एम. बी. पाटील यांची भेट घेऊन कैफियत मांडली. आमदारांनी लगेच प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक शुल्क देऊन मदत केली. त्यांच्या निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रमात या दोन्ही विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रथम वर्षाचे महाविद्यालयीन आणि वसतिगृह शुल्क आणि इतर खर्च असा प्रत्येकी 4,07,196 रुपये मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच, चांगला अभ्यास करून बसवभूमीची शान आणि अभिमान वाढवा, असा कानमंत्र त्यांनी दिला. यावेळी विद्यार्थी चन्नबसूचे वडील आनंद माळी, शेम्मीरचे वडील मेहबुब जातगार, बी.एल.डी.ई. डीम्ड युनिव्हर्सिटीचे कुलसचिव डॉ. आर. व्ही. कुलकर्णी आणि बी.एल.डी.ई. मुख्य प्रशासकीय अधिकारी आर.बी.कोटनाळ व इतर उपस्थित होते.
0 Comments