बेळगाव / प्रतिनिधी

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या व्यथा आणि समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी बेळगाव येथे येणाऱ्या महाराष्ट्रातील सीमा समन्वयक मंत्र्यांची अडवणूक करू नका या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यासाठी गेलेल्या म. ए. समितीच्या अटक केलेल्या नेत्यांची बेळगाव पोलिसांनी सुटका केली.

सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई हे आज बेळगाव येथे येणार होते. मात्र कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून महाराष्ट्राच्या सीमा समन्वयक मंत्र्यांना बेळगाव जिल्ह्याच्या हद्दीत येण्यापासून रोखले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून येणाऱ्या आमच्या नेत्यांची अडवणूक करू नका या मागणीसाठी म. ए. समितीने  बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे निश्चित केले होते. 

त्यानुसार आज दुपारी 3.30 वा. ठरल्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या म. ए. समितीच्या  पदाधिकारी,कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. १४४ कलम लागू असताना अशाप्रकारे निवेदन देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने जमणे चुकीचे असल्याची भूमिका पोलिसांनी घेतली. यावेळी पोलिसांच्या आदेशाला नजुमानता बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देत निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाकडे जाणाऱ्या समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती .