बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर परिसरातील ख्रिश्चन समाज बांधवांनी आज रविवारी ख्रिसमस (नाताळ) सण जल्लोषात साजरा केला. सकाळपासूनच सर्व ख्रिस्ती बांधव परस्परांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना दिसत होते. प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याबरोबरच सोशल मीडियावरही शुभेच्छा संदेशांचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले.
गत दोन वर्षात कोरोना संसर्गामुळे सर्व सण - उत्सव घरापुरते मर्यादित आणि साधेपणाने साजरे करण्यात आले. मात्र कोरोना पूर्णपणे आटोक्यात आल्याने यावर्षी मध्यरात्रीपासूनच सर्व ख्रिस्ती धर्मियांनी चर्चमध्ये प्रभू येशूचा जन्मदिवस साजरा करून जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. ख्रिस्ती धर्मगुरूंनी ही चर्चमध्ये विशेष प्रार्थना करून येशु विषयी माहिती दिली. तसेच येशूने जीवनात दिलेल्या संदेशांचे पालन करण्यास सांगितले.
ख्रिसमस (नाताळ) निमित्त शहरातील चर्चना आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहर परिसरातील ख्रिस्ती बांधवांनी येशूच्या जन्मापासूनचे देखावे साकारले आहेत.
कॅम्प बेळगाव येथील ख्रिश्चन फातिमा कॅथेड्रल चर्चमध्ये विशेष समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बिशप डेरेक फर्नांडिस यांनी सर्व ख्रिश्चन बंधू-भगिनी आणि बेळगावच्या जनतेला नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे सेंट अँथनी चर्च, मेथोडिस्ट चर्च सह अनेक चर्चमध्ये ख्रिश्चनांनी प्रभू येशूची प्रार्थना केली.
एकंदरीत दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर यंदा नेहमीप्रमाणेच ख्रिसमसचा उत्साह दिसून आला.
0 Comments